अभिनेत्री जया प्रदा आणि आझम खान यांच्या संघर्षामुळे रामपूरच्या निकालाकडे सगळयांचे लक्ष लागले होते. उत्तर प्रदेशातील या हायप्रोफाइल लढतीत अखेर समाजवादी पार्टीचे आझम खान यांनी विजय मिळवला. त्यांनी भाजपाच्या उमेदवार जया प्रदा यांचा तब्बल १ लाख ९ हजार ९९७ मतांनी पराभव केला. प्रचाराच्या सुरुवातीलाच आझम खान यांनी जया प्रदा यांच्याबद्दल अश्लील भाषा वापरली. त्यामुळे त्यांना चौफेर टीकेचा सामना करावा लागला.

या निकालानंतर माध्यमांशी बोलताना जया प्रदा म्हणाल्या की, माझ्याच पक्षातील काही लोकांनी विरोधी पक्षाला मदत केली. त्याबद्दल मी पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाशी बोलणार आहे. या लोकांवर कठोर कारवाई करण्याची त्यांनी मागणी केली. आझम खान यांना एकूण ५ लाख ५९ हजार १७७ मते मिळाली. जया प्रदा यांना चार लाख ४९ हजार १८० मते मिळाली. काँग्रेसच्या संजय कपूर यांना फक्त ३५ हजार मते मिळाली.

जया प्रदा यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरुन आझम खान यांच्या विरोधात एफआयआर दाखल झाला. २०१४ साली भाजपाच्या नेपाळ सिंह यांनी रामपूरमधून विजय मिळवला होता.