नागपूर : रामटेक लोकसभा मतदारसंघात सुरुवातीच्या काही फेऱ्यांमध्ये शिवसेनेच्या कृपाल तुमाने यांना काँग्रेसचे किशोर गजभिये यांनी चांगली लढत दिली. परंतु सहाव्या फेरीपासून कृपाल तुमानेंना सर्वच फेऱ्यांमध्ये चांगले मताधिक्य मिळाले.

२०१४ मध्ये झालेल्या निवडणुकीत रामटेक लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे कृपाल तुमाने यांनी काँग्रेसचे दिग्गज नेते व माजी केंद्रीय मंत्री मुकुल वासनिक यांचा पराभव केला होता. यंदाची निवडणूकही चुरशीची होणार असल्याचा अंदाज वर्तवला जात होता, परंतु सुरुवातीला तसे चित्र नव्हते. पहिल्या फेरीत कृपाल तुमाने यांना मिळालेल्या २६,०५६ मतांच्या तुलनेत किशोर गजभिये यांना ५,०६५ मते कमी मिळाली. दुसऱ्या फेरीत तुमाने यांचे मताधिक्य ३,७५० मतांनी वाढले. तिसऱ्या फेरीत तुमाने यांना गजभियेपेक्षा केवळ ५३५ मते जास्त मिळाली. चौथ्या फेरीत तुमाने यांना १९, पाचव्या फेरीत २१६ मते अधिक मिळाली. परंतु सहाव्या फेरीत तुमाने यांनी गजभियेहून ७,८०१ मते अधिक मिळवली. सातव्या फेरीत तुमाने यांना ४,०२४, आठव्या फेरीत ६,४११, नवव्या फेरीत ६,९११ मते अधिक मिळाली.

काटोलमध्ये राष्ट्रवादीला धोक्याची घंटा

शिवसेना उमेदवार कृपाल तुमाने यांना काटोल विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या गजभियेंपेक्षा जास्त मते मिळाली. आमदार डॉ. आशीष देशमुख यांनी भाजपच्या आमदारकीचा राजीनामा देऊन नुकताच काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. अनिल देशमुख हे भविष्यात या मतदार संघातून पुन्हा निवडणूक लढू शकतात. परंतु येथून शिवसेनेचे कृपाल तुमाने यांना चांगले मताधिक्य मिळाल्याने राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या मनात धडकी भरली आहे.