नागपुरातल्या एका उमेदवार यादीत नितीन गडकरींच्या नावावर रिजेक्टेड असा शिक्का मारण्यात आला आहे. नागपुरातल्या न्यू इंग्लिश स्कूल शाळेत हा प्रकार मतदानाच्या दिवशीच घडल्याची माहिती समोर आली आहे. मतदान केंद्रावर असलेल्या यादीवर शिक्के मारण्यात आले होते. त्यात केंद्रीय मंत्री आणि नागपूर भाजपाचे उमेदवार नितीन गडकरी यांच्या नावापुढे ‘रिजेक्टेड’ असा शिक्का मारण्यात आल्याचे वृत्त आहे.

मतदारांना उमेदवारांची माहिती मिळावी यासाठी उमेदवारीची यादी मतदान केंद्राबाहेर लावली जाते. न्यू इंग्लिश स्कूलच्या बाहेरही ही यादी लावण्यात आली. या यादीत गडकरींच्या नावापुढे रिजेक्टेडचा शिक्का मारण्यात आला. एकाच नाही अनेक याद्यांवर हे शिक्के होते. हे शिक्के कुणी मारले? का मारले हे अद्याप समजू शकलेले नाही. एका मराठी वृत्तवाहिनीनीने या संदर्भातले वृत्त दिले आहे.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला. आपण मोठ्या मताधिक्याने विजयी होऊ असा विश्वासही त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केला. अशात त्यांच्या नावापुढे रिजेक्टेडचा शिक्का मारल्याचा प्रकार समोर आला आहे. नितीन गडकरी यांच्याविरोधात उभे असलेले काँग्रेसचे उमेदवार नाना पटोले यांनीही सहकुटुंब मतदानचा हक्क बजावला. सुरक्षेच्या लवाजम्यात मोहन भागवत यांनी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास मतदानाचा हक्क बजावला. दरम्यान नितीन गडकरी यांच्या नावापुढे रिजेक्टेड असा शिक्का कुणी मारला ते मात्र अद्याप समजू शकलेले नाही. या प्रकरणाची चौकशी सुरु आहे.