अमित उजागरे/कृष्णा पांचाळ
ओबीसी समाजाचे प्रश्न संसदेत प्रकर्षाने मांडण्यात यावेत यासाठी डॉ. अमोल कोल्हे यांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून शिरुर लोकसभा मतदारसंघासाठी संधी देण्यात आली आहे. या ओबीसी कार्डचा अथवा ओबीसी प्रतिनिधित्वाचा निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी महाआघाडीला नक्कीच फायदा होईल, अशी आशा भोसरीचे माजी आमदार विलास लांडे यांनी व्यक्त केली आहे. लोकसत्ता डॉटकॉमशी त्यांनी संवाद साधला यावेळी त्यांनी शिरुर मतदारसंघतील विविध मुद्द्यांवर चर्चा केली.

लांडे म्हणाले, डॉ. अमोल कोल्हे सर्वसमावेशक आहेत, तरुण आहेत. इतर मागासवर्गीय समाजातील आणि शेतकरी कुटुंबातील ते असून त्यांचे आजोबा बैलगाडा मालक होते. त्यांची ही कौटुंबिक पार्श्वभूमी पाहता शरद पवारांनी त्यांची लोकसभेसाठी निवड केली. कोल्हेंच्या ओबीसी प्रतिनिधीत्वाचा या निवडणुकीत आघाडीला नक्कीच फायदा होईल असं मला वाटतं. छगन भुजबळ यांनी ज्या प्रकारे काम केलं. त्याचप्रकारे किंबहुना त्यापेक्षा अधिक कोल्हेंनी काम करणं अपेक्षित आहे. ओबीसींसाठी काम करतील या भावनेनेच शरद पवार आणि भुजबळांनी अमोल कोल्हेंसारख तरुण नेतृत्व पुढं आणण्याचा प्रयत्न केला आहे.

युती सरकारनं माळी समाजाला प्रतिनिधीत्व दिलं नाही. मुख्यमंत्र्यांनीही मराठा, धनगर आरक्षणाबाबत सगळ्यांच्या तोंडाला पानं पुसली. भोसरी विधानसभा मतदारसंघात ६५ टक्के जनता ही इतर मागासवर्गीय आहे, अल्पसंख्यांक आहे. या ओबीसींमधील एखाद्या जातीला प्रतिनिधीत्व मिळालं नाही तरी त्यांचा नेता म्हणून अमोल कोल्हे हे प्रतिनिधीत्व करु शकतात. संसदेत ते चांगल्या प्रकारे ओबीसींची भुमिका मांडू शकतात, त्यांचं इंग्रजी भाषेवर प्रभुत्व आहे, ते अभ्यासू आणि अत्यंत प्रगल्भ आहेत.
आता प्रचाराचा मुद्दा पाहिला तर तरुण वर्ग आणि महिलांमध्ये अमोल कोल्हेंना जास्त पसंती आहे. सर्व जातींना पुढे घेऊन जाण्यासाठी छत्रपतींचा हा मावळा काम करतोय या मावळ्याला ताकद द्यायला हवी ही भावना लोकांच्या मनात असल्याने ते नक्कीच निवडून येतील अशी आशा लांडे यांनी व्यक्त केली आहे.

पक्षावर नाराजी नाही – लांडे
मी पक्षावर आणि नेत्यांवर नाराज नाही. यावेळी साहेबांनी सांगितलं म्हणून आम्ही प्रचार सुरु केला माझ्या कार्यकर्त्यांनी सहाही तालुके ढवळून काढले होते. पण हरकत नाही आम्ही प्रामाणिक आहोत, पक्षावर आमची निष्ठा असल्याने दुसऱ्या पक्षात जाऊन आम्हाला स्वतःची किंवा कार्यकर्त्यांची प्रतिमा मलीन करायची नाही. सत्तेसाठी मी आज दुसऱ्या पक्षात जाईन, तिथले लोक बोलवतीलही पण मला तसं करायचं नाही.