रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांना अखेर पंतप्रधान कार्यालयातून फोन आला असून केंद्रीय मंत्रीपदाची शपथ घेणार असल्याचं शिक्कमोर्तब झालं आहे. रामदास आठवले यांच्या समर्थकांनी कोणतीही अधिकृत घोषणा होण्याआधीच जल्लोषाची तयारी केली होती. दुसरीकडे रामदास आठवलेदेखील आपल्याला फोन येईल असा विश्वास व्यक्त करत होते. पण कोणतीही अधिकृत माहिती नसल्याने नेमकं काय होणार याची सर्वांना उत्सुकता होती. पण अखेर चित्र स्पष्ट झालं असून रामदास आठवले केंद्रीय मंत्रिपदाची शपथ घेणार हे ठरलं आहे.

रामदास आठवले यांना पंतप्रधान कार्यालयातून दूरध्वनी आला असून ४.३० वाजता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी भेटण्याचे निमंत्रण दिले आहे. आज सायंकाळी केंद्रीय मंत्रिपदाची शपथ घेण्याचे अधिकृत निमंत्रण रामदास आठवले यांना प्राप्त झाले आहे अशी माहिती देण्यात आली आहे.

याआधी बोलताना रामदास आठवले यांनी आमच्या पक्षातर्फे मी एकटाच खासदार आहे. जर आमच्या पक्षाला मोदींनी घेतलं तर माझाच नंबर लागेल असा विश्वास व्यक्त केला होता. मोदींच्या कार्यकाळात अनेक कामं झाली ज्यांचा प्रचार मी चांगल्या पद्धतीने देशभरात केला. भाजपाला दलितांची भरघोस मतं मिळाली आहेत असंही रामदास आठवले यांनी सांगितलं होतं.