03 March 2021

News Flash

नोटा, दारू, अमली पदार्थाचा सुकाळ ; निवडणूक काळात देशभरातून १९०० कोटींचा मुद्देमाल जप्त

उत्तर प्रदेशात दारूला, तर पंजाबमध्ये अमली पदार्थाना पसंती असावी, असे या कारवाईवरून दिसते.

मुंबई : नोटाबंदीनंतरच्या पहिल्याच सार्वत्रिक निवडणुकीत पैशाच्या खैरातीस आळा बसेल हा अंदाज सपशेल खोटा ठरला आहे. निवडणूक आयोगाने देशातील विविध राज्यांमधून गेल्या काही दिवसांत सुमारे ५३० कोटींची रोकड, ७२५ कोटींचे अमली पदार्थ आणि १८६ कोटींची दारू, मौल्यवान वस्तू असा तब्बल १९०८ कोटींचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. दारूबंदी असलेल्या गुजरातेतून आयोगाने नऊ कोटी रुपये किमतीची तीन लाख लिटर दारू, पावणेचार कोटींची रोकड आणि तब्बल पाचशे कोटी रुपये किमतीचे १११ किलो अमली पदार्थ जप्त केले आहेत. आंध्र प्रदेश, तमिळनाडू, उत्तर प्रदेश या राज्यांमध्येही दारू, पैसा, अमली पदार्थ आणि मौल्यवान वस्तूंचा स्वैर संचार वाढला असून, आपणही यात मागे नाही हे महाराष्ट्रानेही दाखवून दिले आहे.

निवडणुकीच्या काळात मतदारांना पैसा, दारू, अमली पदार्थ तसेच विविध मौल्यवान वस्तूंची प्रलोभने दाखवून मते खरेदी करण्याचे प्रयत्न होत असल्याच्या आरोपांना या कारवायांमुळे पुष्टी मिळाली आहे. तमिळनाडूमध्ये जप्त करण्यात आलेल्या साडेपाचशे कोटींच्या मुद्देमालापैकी निव्वळ १७१.३४ कोटींची रोकड आणि २३० कोटी रुपये किमतीच्या सोने, चांदी वा अन्य मौल्यवान वस्तूंचा समावेश आहे, तर आंध्र प्रदेशातून ११८.६९ कोटींची रोकड, २४.१५ कोटींची सव्वासहा लाख लिटर दारू आणि ३३ कोटींच्या मौल्यवान वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत. उत्तर प्रदेशात दारूला, तर पंजाबमध्ये अमली पदार्थाना पसंती असावी, असे या कारवाईवरून दिसते. उत्तर प्रदेशातील कारवायांमध्ये ३८.४४ कोटी रुपये किमतीची १३.८४ लाख लिटर दारू जप्त करण्यात आली असून ३२ .४६ कोटींची रोकड, २२ कोटींचे अमली पदार्थ आणि ६८ कोटींच्या मौल्यवान वस्तूही आयोगाने हस्तगत केल्या आहेत.

पंजाबमधून जप्त करण्यात आलेल्या १६९.६० कोटींच्या मुद्देमालामध्ये १२५.७८ कोटींचे अमली पदार्थ, सहा कोटींची दारू, सुमारे १९ कोटींची रोकड आणि सुमारे साडेअठरा कोटींच्या २६८ किलो सोने-चांदी व अन्य मौल्यवान वस्तूंचा समावेश आहे.

राज्यात ३० कोटींची रोकड जप्त

महाराष्ट्रातही सोनेचांदी, रोकड, दारू आणि अमली पदार्थाची उधळण सुरू असल्याचे ९ एप्रिलपर्यंतच्या आयोगाच्या कारवाईवरून दिसते. तब्बल ३० कोटींची रोकड, १७ कोटींची २२ लाख लिटर दारू, सुमारे साडेचार कोटींचा १४ हजार किलो अमली पदार्थाचा साठा महाराष्ट्रातून आयोगाने जप्त केला आहे.  सोने-चांदी वा अन्य मौल्यवान भेटवस्तू देऊन मतदारांना खूश करण्याचे प्रयत्न होत असल्याच्या चर्चेस तमिळनाडू, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, आंध्रातील कारवायांमुळे बळकटी मिळते. दारूबंदी असलेल्या बिहारमध्ये मात्र, अन्य राज्यांच्या तुलनेत दारू, अमली पदार्थ, किवा भेटवस्तूंचा वावर कमालीचा कमी असून ८६ हजार लिटर दारू, ६१ किलो अमली पदार्थ आणि सव्वाचार कोटींची रोकड एवढाच मुद्देमाल आयोगाने जप्त केला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 11, 2019 1:01 am

Web Title: rs 530 crore cash liquor worth 186 crore and drug rs 725 crore seized ahead of elections
Next Stories
1 भाजपला सोपी वाटणारी सांगलीची लढत चुरशीची
2 मजबूत सरकारसाठी मोदींनाच पुन्हा संधी द्या!
3 प्रचार साहित्याच्या मागणीत लक्षणीय घट
Just Now!
X