वाराणसी लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी रद्द करण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाला बीएसएफचे बडतर्फ जवान तेज बहाद्दूर यादव यांनी सोमवारी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले. सपा-बसपाचे उमेदवार तेज बहाद्दूर यादव यांना वाराणसीतून पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात निवडणूक लढवायची होती.

मागच्या आठवडयात निवडणूक आयोगाने त्यांची उमेदवारी रद्द केली. तेज बहाद्दूर यादव सीमा सुरक्षा दलात होते. २०१७ साली त्यांनी सैन्यात मिळणाऱ्या निकृष्ट दर्जाच्या आहारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करुन सोशल मीडियावर त्यासंबंधीचा व्हिडिओ पोस्ट केला. त्यानंतर त्यांना सेवेतून बडतर्फ करण्यात आले.

माहिती लपवली म्हणून निवडणूक आयोगाने तेज बहाद्दूर यादव यांची उमेदवारी रद्द केली. उमेदवारी रद्द करण्याचा निवडणूक आयोगाचा निर्णय भेदभाव करणारा असून हा निर्णय तात्काळ रद्द करावा अशी मागणी यादव यांनी याचिकेतून केली आहे. समाजवादी पार्टीने आधी वाराणसीमधून शालिनी यादव यांना उमेदवारी जाहीर केली होती. नंतर त्यांनी तेजबहाद्दूर यादव यांना पाठिंबा दिला. तेज बहाद्दूर यादव निवडणूक रिंगणातून बाहेर गेल्यामुळे आता पंतप्रधान मोदी आणि काँग्रेसचे अजय राय यांच्यातच मुख्य लढत रंगेल. कदाचित सपा-बसपा काँग्रेस उमेदवाराला पाठिंबा देऊ शकतात.