23 October 2019

News Flash

हेमंत करकरेंबद्दलच्या वक्तव्यावर साध्वी प्रज्ञा यांनी मागितली माफी

भाजपाच्या उमेदवार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी दिवंगत एटीएस प्रमुख हेमंत करकरे यांच्याबद्दल केलेले वादग्रस्त वक्तव्य मागे घेतले आहे.

संग्रहित छायाचित्र

भाजपाच्या उमेदवार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी दिवंगत एटीएस प्रमुख हेमंत करकरे यांच्याबद्दल केलेले वादग्रस्त वक्तव्य मागे घेतले आहे. माझ्या विधानामुळे देशाच्या शत्रूंचा फायदा होत आहे. त्यामुळे मी माझे वक्तव्य मागे घेऊन माफी मागते. ते माझे व्यक्तीगत दु:ख होते असे साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी म्हटले आहे.

साध्वी प्रज्ञा यांच्यावर चौफेर टीका झाल्यानंतर त्यांनी आपल्या वक्तव्याबद्दल माफी मागितली. आयपीएस असोशिएशनने साध्वी प्रज्ञा यांच्या वक्तव्याचा निषेध केला होता. भाजपानेही या विधानाशी आपला संबंध नाही असे सांगून हात वर केले होते. त्यामुळे साध्वी प्रज्ञा यांनी आता माफी मागितली आहे.

काय म्हणाल्या होत्या साध्वी प्रज्ञा
गुरुवारी एका कार्यक्रमात बोलताना साध्वी प्रज्ञा यांनी दिवंगत एटीएस प्रमुख हेमंत करकरे यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले. हेमंत करकरे यांनी मला खोट्या गुन्ह्यात अडकवल्याचा आरोप त्यांनी केला. “तो तपास अधिकारी सुरक्षा आयोगाचा सदस्य होता. त्याने हेमंत करकरे यांना बोलावले आणि सांगितले की पुरावे नसतानाही साध्वीला तुरुंगात का डांबले. यावर हेमंत करकरे यांनी सांगितले की, मी काहीही करेन, पण साध्वीविरोधात पुरावे सादर करणारच, मी साध्वीला सोडणार नाही”, असा आरोप साध्वी प्रज्ञा सिंह यांनी केला.

हेमंत करकरे याने हा देशद्रोह केला होता. तो मला विचारायचा की खरं जाणून घेण्यासाठी मला देवाकडे जावं लागेल का. यावर मी म्हटलं की तुम्हाला आवश्यकता वाटत असेल तर तुम्ही जाऊ शकता. मी करकरे यांना सांगितले की तुमचा सर्वनाश होईल. त्याने मला शिवीगाळ केली होती. ज्या दिवशी मी तुरुंगात गेले त्या दिवशी सुतक सुरु झाले आणि ज्या दिवशी दहशतवाद्यांनी करकरे यांना मारले त्या दिवशी सुतक संपले, असे वादग्रस्त विधान साध्वींनी केले

First Published on April 19, 2019 9:17 pm

Web Title: sadhvi pragya apologize for her statement on hemant karkare