मालेगावच्या भिक्कू चौकात २९ सप्टेंबर २००८ मध्ये बॉम्बस्फोट झाला. या स्फोटात सहा जणांचा मृत्यू तर ८०हून अधिक जखमी झाले. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या राज्य दहशतवादविरोधी पथकाने या स्फोटाशी संबंध असल्याच्या आरोपावरून पहिली अटक केली ती साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर यांना.

* मालेगाव स्फोटात वापरली गेलेली एलएमएल वेस्पा ही स्कूटर साध्वी प्रज्ञा यांच्या नावे होती. ही स्कूटर साध्वी प्रज्ञा यांचा सहकारी रामजी कालसंगरा वापरत होता. या स्फोटाप्रकरणी कालसंगरा याला फरारी घोषित करण्यात आले आहे. साध्वी प्रज्ञा आणि कालसंगरा यांच्यात स्फोटाबाबत झालेले दूरध्वनी संभाषण हाही एक महत्त्वाचा पुरावा सादर करण्यात आला. या काळात हेमंत करकरे हे राज्य दहशतवादविरोधी पथकाचे प्रमुख होते. २६ नोव्हेंबर २००९च्या दहशतवादी हल्ल्यात ते शहीद झाले. त्यानंतर साध्वी प्रज्ञा यांना विनाकारण या स्फोटात गुंतविण्यात आल्याचा आरोप जोर धरू लागला. अखेर हा तपास २०११ मध्ये ‘राष्ट्रीय तपास यंत्रणे’कडे सोपविण्यात आला. मात्र तपास यंत्रणेनेही त्यात फारसे काही केले नाही. मात्र २०१६ मध्ये ‘राष्ट्रीय तपास यंत्रणे’ने या प्रकरणात पुरवणी आरोपपत्र दाखल केले आणि साध्वी प्रज्ञा यांना ‘क्लिन चीट‘ दिली.

* या आरोपपत्रात ‘राष्ट्रीय तपास यंत्रणे’ने म्हटले आहे की, राज्याच्या दहशतवादविरोधी विभागाने याप्रकरणी नोंदीवर आणलेल्या पुराव्यांची खातरजमा केल्यावर, स्फोटात वापरलेली स्कूटर ही साध्वी प्रज्ञा यांच्या नावे असली तरी ती दोन वर्षांपासून कालसंगरा वापरत होता. इतर साक्षीदारांनी आपली जबानी बदलली आहे, असेही त्यात नमूद होते. त्यानंतर साध्वी प्रज्ञा हिने जामिनासाठी अर्ज केला. २८ जून २०१६ मध्ये विशेष न्यायालयाने तो फेटाळला. स्फोटात वापरलेली स्कूटर ही साध्वी प्रज्ञा यांच्या नावे असलेली वस्तुस्थिती दुर्लक्षित करता येत नाही, असे मत जामीन फेटाळताना नोंदविला. मात्र मुंबई उच्च न्यायालयाने २५ एप्रिल २०१७ रोजी साध्वी प्रज्ञा यांना जामीन मंजूर केला.

* जामीन मिळताच साध्वी प्रज्ञा यांनी आपल्याला दोषमुक्त करावे, असा अर्ज विशेष न्यायालयात केला. मात्र या स्फोटात वापरली गेलेली स्कूटर ही साध्वी प्रज्ञा यांच्या नावावर असल्याचे पुन्हा नमूद करीत २७ डिसेंबर २०१७ रोजी विशेष न्यायालयाने हा अर्ज फेटाळला. विशेष न्यायालयात सध्या हा खटला सुरू आहे. साक्षीदारांचे जबाब नोंदविणे सुरू आहे. वैद्यकीय कारणास्तव साध्वी प्रज्ञा यांनी न्यायालयात हजर न राहण्याची सवलत मिळविली आहे.

* साध्वी प्रज्ञा यांचा जामीन रद्द व्हावा, यासाठी मालेगाव बॉम्बस्फोटातील सय्यद अजहर या मृताचे वडील निसार अहमद सय्यद बिलाल यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. गेल्या जुलै महिन्यात साध्वी प्रज्ञा यांना सर्वोच्च न्यायालयाने नोटीस दिली आहे.

* भाजपने साध्वी प्रज्ञा यांना  भोपाळमधून उमेदवारी दिल्यानंतर निसार अहमद यांनी पुन्हा विशेष न्यायालयात अर्ज करून खटला सुरू असताना तिला निवडणूक लढविण्यापासून बाद करण्याची मागणी केली आहे. या अर्जावर  प्रज्ञा यांना म्हणणे मांडण्यास विशेष न्यायालयाने सांगितले आहे. त्यांनी ३० ऑक्टोबर २०१८ मध्ये विशेष  न्यायालयात  शेवटची हजेरी लावली होती.

मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात कोठडीमध्ये असताना वाईट वागणूक देणारे एटीएस प्रमुख हेमंत करकरे यांना आपण शाप दिला होता, त्यामुळेच २६/११ च्या मुंबई हल्ल्यात ते मारले गेले, असे वक्तव्य मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी व भोपाळच्या भाजप उमेदवार प्रज्ञासिंह ठाकूर यांनी केले आहे. त्यांच्या या वक्तव्यावर जनमानसात संतप्त प्रतिक्रिया उपटत आहेत.

हिणकस स्वरूपाचे विधान – सुशीलकुमार

साध्वी प्रज्ञासिंह हिला भाजपने लोकसभेचे उमेदवारी दिली आहे. यातूनच त्यांची आगामी राजकारणाची दिशा समजते. त्यांनी ज्येष्ठ पोलीस अधिकारी हेमंत करकरे यांच्याविषयी केलेले विधान हिणकस स्वरूपाचे आहे, अशी स्वरूपाची प्रतिक्रिया काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी व्यक्त केली आहे. साधू व साध्वींना संसदेत आणून राज्य घटनेला अभिप्रेत असलेले राजकारणच भाजपाला बदलायचे आहे, असेही ते म्हणाले.

टिपणी अयोग्य

कोणाच्याही निधनाविषयी टिपणी करणे योग्य नाही, अशी प्रतिक्रिया राज्याचे माजी पोलीस महासंचालक जयंत उमराणीकर यांनी व्यक्त केली. मी कोणाच्याही बाजूने भूमिका घेत नाही. पण, साध्वी प्रज्ञा सिंह यांच्यावर अन्याय झाला यात शंका नाही. त्यांचा मानसिक छळ नक्की झाला आहे. ही बाब त्यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली. त्यांची शारीरिक दशा पाहता ते खरे वाटते. त्यामुळेच साध्वी प्रज्ञा सिंह यांनी केलेल्या वक्तव्यातून त्यांचा राग बाहेर पडला असावा. त्यांची टीका अक्षम्य असली, तरी त्यांनी असे वक्तव्य का केले असावे हे समजून घेतले पाहिजे, असेही उमराणीकर यांनी स्पष्ट केले.