18 October 2019

News Flash

साध्वी प्रज्ञासिंगवर गुन्हा दाखल करा – अशोक चव्हाण

भाजप सरकारला लोकसभेच्या निवडणुकीत धडा शिकविण्याची वेळ आल्याचे चव्हाण यांनी सांगितले.

(संग्रहित छायाचित्र)

मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले दहशतवादविरोधी पथकाचे प्रमुख हेमंत करकरे यांच्याविषयी अपशब्द काढणाऱ्या साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर या देशद्रोही असून त्यांच्यावर तातडीने गुन्हा करावा, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केली.

रावेर लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस महाआघाडीचे उमेदवार डॉ. उल्हास पाटील यांच्या प्रचारार्थ शनिवारी मुक्ताईनगर तालुक्यातील कुऱ्हा येथे आयोजित सभेत चव्हाण यांनी भाजप सरकारच्या कारभारावर जोरदार टीका केली. काँग्रेसच्या काळात विकासात आघाडीवर असणाऱ्या राज्याची युतीच्या काळात पूर्णत: वाताहत झाली असून शेतकरी देशोधडीला लागले. सत्तेचा दुरूपयोग करणाऱ्या सरकारबद्दल देशात प्रचंड नाराजी आहे. शेतकरी हवालदिल झाला आहे. केवळ महाराष्ट्रात आतापर्यंत हजारो शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. सर्वच पातळीवर अपयशी ठरलेले हे सरकार तरूणांच्या हाताला काम देऊ शकलेले नाही. दुधासह शेतीमालास भाव नाही. दुष्काळाची नुसती घोषणा झाली. प्रत्यक्षात शेतकऱ्यांवरील थकीत कर्जाची वसुली थांबलेली नाही. बोदवड उपसा सिंचन प्रकल्पांचे काम निधीअभावी थांबले आहे. अशा भाजप सरकारला लोकसभेच्या निवडणुकीत धडा शिकविण्याची वेळ आल्याचे चव्हाण यांनी सांगितले.

First Published on April 21, 2019 1:09 am

Web Title: sadhvi pragya singh to file a complaint ashok chavan