मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी व भोपाळमधील भाजप उमेदवार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांची योग गुरू रामदेवबाबा यांनी पाठराखण केली असून प्रज्ञासिंह यांचा केवळ संशयाच्या आधारे तुरुंगात नऊ वर्षे क्रूरपणे छळ करण्यात आला हा मोठा अन्याय होता, असे त्यांनी म्हटले आहे.

रामदेव यांनी हरिद्वार येथे सोमवारी सांगितले, की साध्वी प्रज्ञा यांना नऊ वर्षांच्या तुरुंगवासात असह्य़ यातना देण्यात आल्या. त्यांनी काही चुकीचे विधान केले असेल तर त्यांना रोखण्यात गैर काही नाही पण त्यांना तुरुंगात केवळ संशयाच्या आधारे अमानवी वागणूक देण्यात आली.

महाराष्ट्र एटीएसचे प्रमुख हेमंत करकरे हे आपल्या शापामुळेच २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यात मारले गेले असे वक्तव्य साध्वी प्रज्ञा यांनी केले होते.

योगगुरू रामदेव बाबा यांनी सांगितले, की मी कुठल्या राजकीय पक्षाचा नाही पण सध्या देशात राजकीय, आर्थिक व धार्मिक पातळीवर अनेक आव्हाने आहेत, या आव्हानांवर मात केली, तर भारत २०४०पर्यंत महासत्ता होऊ शकतो.

देशात दारिद्रय़ व बेरोजगारी हे दोनच प्रश्न आहेत, असे समजणे चुकीचे आहे कारण राम व राष्ट्रवाद हे दोन्ही प्रश्न तेवढेच महत्त्वाचे आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले.