अपक्ष उमेदवारांचा खर्च हजारोंच्या मर्यादेत

नाशिक, दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील एकूण सात उमेदवारांचा खर्च लाखोंच्या घरात गेला असून उर्वरित १९ उमेदवारांचा खर्च काही हजारांत असल्याचे समोर आले आहे. उमेदवारी अर्ज दाखल केल्यापासून गुरुवापर्यंत नाशिक लोकसभा मतदारसंघातील महाआघाडीचे उमेदवार समीर भुजबळ यांनी सर्वाधिक म्हणजे २० लाख ७३ हजार रुपये खर्च केला आहे. त्यांच्या विरोधात रिंगणात उतरलेल्या सेना-भाजप महायुतीचे हेमंत गोडसे यांचा खर्च ११ लाख ४३ हजार, तर अपक्ष उमेदवार माणिक कोकाटे यांचा खर्च १३ लाख, २४ हजार रुपये आहे. दिंडोरीत महायुतीच्या डॉ. भारती पवार यांनी आतापर्यंत सर्वाधिक साडेसात लाख रुपये खर्च केला आहे. ‘माकप’चे जिवा पांडू गावितही खर्चात मागे नाहीत.

उमेदवारी पत्र दाखल केल्यानंतर उमेदवाराला दैनंदिन खर्चाची माहिती लेखी स्वरूपात ठेवावी लागत असून लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांना ७० लाखांपर्यंत खर्च करण्याची मर्यादा आहे. नाशिक लोकसभा मतदारसंघात १८, तर दिंडोरीत आठ उमेदवार रिंगणात आहेत. अर्ज दाखल करणाऱ्या प्रत्येक उमेदवाराने दैनंदिन खर्चाचा हिशेब ठेवणे बंधनकारक आहे. कोणकोणत्या बाबींवर खर्च केला, त्यासंबंधीची देयके आदी माहिती ठेवावी लागते. प्रचारात गुंतलेल्या काही उमेदवारांना दैनंदिन खर्चाची माहिती ठेवणे, सादर करण्याचा विसर पडला होता. नाशिक मतदारसंघातील तीन उमेदवारांनी खर्चाची माहिती सादर केली नसल्याचे निदर्शनास आले होते. उमेदवारांनी सादर केलेल्या माहितीची खर्च निरीक्षकांनी तपासणी केली. त्यानुसार आतापर्यंत उमेदवारांनी कसा, कुठे खर्च केला, याची आकडेवारी उघड झाली आहे.

नाशिक लोकसभा मतदारसंघात निवडणूक खर्चात काँग्रेस आघाडीचे उमेदवार समीर भुजबळ आघाडीवर आहेत. त्यांनी अर्ज दाखल केल्यानंतर नऊ दिवसांत २० लाख ७३ हजारहून अधिकचा खर्च केला. त्यांचे प्रतिस्पर्धी महायुतीचे हेमंत गोडसे यांचा खर्च भुजबळ यांच्यापेक्षा निम्म्याने कमी आहे. गोडसेंनी १० दिवसांत ११ लाख ४८ हजार ९३७ रुपये खर्च केले. प्रमुख राजकीय पक्षांच्या उमेदवारांच्या खर्चाशी अपक्ष उमेदवार माणिक कोकाटे स्पर्धा करीत आहेत. त्यांनी आतापर्यंत १३ लाख २५ हजार रुपये खर्च केला आहे. हे तीन उमेदवार वगळता उर्वरित १५ उमेदवारांचा खर्च एक लाखाच्या आत आहे. वंचित बहुजन विकास आघाडीचे पवन पवार यांनी आतापर्यंत ८९ हजार ८७३, अपक्ष सुधीर देशमुख ५१ हजार, देवीदास सरकटे १२ हजार, प्रियंका शिरोळे २५ हजार, शरद धनराव १४ हजार, संजय घोडके ३० हजार २४०, शिवनाथ कासार २५ हजार, प्रकाश कनोजे २६ हजार, धनंजय भावसार यांचा खर्च २५ हजारहून अधिक आहे. सिंधुबाई केदार यांनी खर्चाची माहिती सादर केलेली नाही.

दिंडोरीत खर्चात महायुती-माकपची स्पर्धा

दिंडोरी लोकसभा मतदारसंघात महायुतीच्या डॉ. भारती पवार यांनी अर्ज भरल्यापासून आतापर्यंत सात लाख ४४ हजारहून अधिकचा खर्च केला आहे. या खालोखाल खर्च ‘माकप’च्या जे. पी. गावितांचा आहे. त्यांनी पाच लाख १४ हजारहून अधिक रुपये खर्च केले आहेत. काँग्रेस महाआघाडीचे धनराज महाले यांनी साडेतीन लाख रुपये खर्च केले आहे. अ‍ॅड. टिकाराम बागूल यांनी दीड लाख, दत्तू बर्डे १८ हजार, बसपचे अशोक जाधव १७ हजार ७००, वंचित बहुजन विकास आघाडीचे बापू बर्डे यांनी २० हजार ७०० रुपये खर्च केल्याची माहिती निवडणूक शाखेने दिली आहे. माघारी घेणाऱ्या हेमराज यांनी २३ हजार रुपये खर्च केले आहेत.