शहा यांच्या हेलिकॉप्टरला परवानगी नाकारली; ‘कंगाल’ वक्तव्याने वाद

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सोन्याचा धूर निघणारा बंगाल कंगाल केल्याचा आरोप भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी केला आहे.  शहा यांनी राज्यातील जनतेचा अपमान केल्याचे प्रत्युत्तर तृणमूल काँग्रेसने दिले आहे. बंगाली जनतेबाबत शहा यांच्या मनात काय भावना हे यातून दिसून आले अशी टीका तृणमूलचे नेते डेरेक ओ-ब्रायन यांनी केली आहे.

पश्चिम बंगालमध्ये भाजप विरुद्ध तृणमूल असाच संघर्ष सोमवारी तीव्र झाला. जादवपूर मतदारसंघातील बरियूपूर येथे अमित शहा यांचे हेलिकॉप्टर उतरू देण्यास प्रशासनाने परवानगी नाकारली. त्यामुळे वाद सुरु झाला. तृणमूल मला अडवू शकेल मात्र आमचा विजयरथ त्यांना थांबवता येणार नाही असा इशारा अमित शहा यांनी दिला.

जॉयनगर येथील सभेत शहा यांनी ममतांना अटक करून दाखवाच असा इशारा दिला. जय श्री राम म्हणताच ममतांना संताप येतो. मात्र मी रामाचा जयघोष करणार, ममतांनी हिंमत असेल तर अटक करून दाखवावी असा इशारा शहा यांनी दिला. घुसखोरांचे संरक्षण करण्यातच ममतांना रस आहे असा आरोप शहा यांनी केला.

अमित शहा यांनी कंगाल बांगला असे वर्णन करुन त्यांच्या मनात बंगालबाबत काय भावना ते उघड झाले आहे अशी टिप्पणी तृणमूल काँग्रेसचे नेते डेरेक ओ-ब्रायन यांनी केली आहे. हा बंगालचा अपमान असल्याचा आरोप त्यांनी केली आहे.

योगींना परवानगी नाकारली

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या बुधवारी कोलकाता येथील सभेला राज्य सरकारने परवानगी नाकारली आहे. याबाबतचा आरोप भाजप नेते सुनील देवधर यांनी केला आहे. त्यामुळे दिवसेंदिवस भाजप विरुद्ध तृणमूल संघर्ष वाढत असल्याचे चित्र आहे.

मोदी यांना एकही मत देऊ नका – ममता

नामखाना (प. बंगाल): पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देश नष्ट करतील, त्यामुळे त्यांना कुणी एक मतही देऊ नये, असे आवाहन पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मतदारांना केले.मोदी यांनी गेल्या पाच वर्षांमध्ये देशासाठी काहीही केले नाही, असे ममता यांनी सुंदरबन भागातील नामखाना येथील प्रचारसभेत सांगितले. तुम्ही ‘चौकीदाराची’ पंतप्रधान म्हणून निवड कराल, तर ते देश नष्ट करतील. भाजपने अल्पसंख्याक, आदिवासी आणि पत्रकारांनाही ठार मारल्याचा आरोप बॅनर्जी यांनी केला. भाजपला घाबरण्यासारखे काही नाही. त्यांना मते देऊ नका. याशिवाय, माकप आणि काँग्रेसला  मत गेले, तर त्यामुळे भाजपचेच हात बळकट होतील, असे ममतांनी सांगितले.