या वयात फिरतो म्हणजे मी काय म्हातारा झालो का? असा सवाल करत काय काळजी करु नका मी भक्कम आहे. या मोदीला घालवल्याशिवाय आणि बळीराजाचे राज्य आणल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केला आहे. शिवाय असेल नसेल ती शक्ती बळीराजाच्या भल्यासाठी वापरण्यासाठी घडयाळाच्या चिन्हावर बटण दाबून राष्ट्रवादीला विजयी करा असं आवाहनही शरद पवार यांनी केले. निफाडच्या जाहीर सभेत ते बोलत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सभेत शरद पवार यांनी भाजपा सरकारचा खरपूस समाचार घेतला. ‘आम्ही शेतीबाबत निर्णय घेतल्यामुळे देशातील शेती उत्पादन वाढले होते. परंतु आज काय परिस्थिती आहे. नवीन कारखानदारी आली नाही. शेती संकटात म्हणजे देशाची आर्थिक स्थिती संकटात येते. शेतकऱ्यांची क्रयशक्ती वाढली तर अर्थव्यवस्थेला मदत होते. शेतकऱ्यांची खरेदी करण्याची ताकद नसेल तर उद्योग, कारखाने संकटात येतात. तेच चित्र आज पहायला मिळत आहे कारण या सरकारला शेतकऱ्यांविषयी आस्था नाही’, असा आरोप शरद पवार यांनी केला.

मोठया लोकांकडे काळा पैसा आहे. शेतकऱ्यांकडे कुठचा काळा पैसा. श्रीमंतांच्या काळ्या पैशाला हात लावला नाही. शेतकऱ्यांचा व्यवसाय चलनबंदीच्या माध्यमातून संकटात आणला आणि शेतकऱ्यांना संकटात आणण्याचे पाप भाजपा सरकारने केल्याची टीकाही शरद पवार यांनी केली.

व्यापारी बांधव सुरुवातीला मोदी नावाचा गजर करत होते आणि आता मोदींना काढून टाकण्याचा विचार करत आहेत. नशीब कळंल बिचार्‍यांना की हा गडी आपला नाही… हा कुणाचाच नाही… शेतकऱ्यांचा नाही… व्यापाऱ्यांचा नाही… उद्योगधंद्यातील लोकांचा नाही… बेकारी वाढली हे केंद्र सरकारने जाहीर केले त्यामुळे नव्या पिढीचाही नाही… मग देश कुणासाठी द्यायचा यांच्या हातात. यांच्या हातात देश दयायचा म्हणजे मुठभर लोकांच्या हिताची जपणूक करणारे घटक आहेत त्यांच्या हातात देश देण्यासारखं आहे असंही शरद पवार यांनी म्हटलं.

धनराज महाले यांना मतदान करा. घड्याळाचे बटण दाबा कारण आम्हाला या देशाच्या संसदेत शेतकरी, कष्टकरी, बेरोजगार, छोटे व्यावसायिक यांच्या हिताची जपणूक करणारी एक लॉबी हवी आहे असं शरद पवार यांनी यावेळी सांगितलं.

आमचा संघर्ष होतो, परंतु आम्ही स्वाभिमानी शेतकरी संघटनेला का सोबत घेतले. कारण ते शेतकऱ्यांसाठी संघर्ष करतात. कधी कधी आमच्यावरही टीका करतात परंतु टीका केली तरी विचार शेतकऱ्यांच्या भल्यासाठी असतो. त्यामुळे या सगळ्यांना बरोबर घेवून दिल्ली कशी नरमत नाही हे बघतो असे सांगतानाच एकदा दिल्लीत ताकद निर्माण झाली तर सरकारचे धोरण बदलू शकतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी तसा अधिकार आपल्याला दिला आहे. त्या अधिकाराचा वापर करणारे खासदार आपल्याला दिल्लीत हवेत म्हणून धनराज महाले यांना मतदान करा असं आवाहन शरद पवार यांनी केले.

 

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sharad pawar criticise narendra modi in nashik
First published on: 24-04-2019 at 16:37 IST