विस्तवाशी खेळू नका, तुमचे सरकार उलथवून टाकू असे म्हणत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील कागल येथे खासदार धनंजय महाडिक आणि खासदार राजू शेट्टी यांच्या प्रचारासाठी झालेल्या सभेत बोलताना पवार यांनी मोदी सरकारवर तिखट शब्दांत टीकास्त्र सोडले.

संसद,घटना, रिझर्व्ह बँक, न्यायालय अशा सर्व प्रकारच्या घटनात्मक संस्थांवर हल्ला मोदी सरकारने केला आहे. असे होत असेल तर सरकार कोणासाठी चालवले जात आहे हे कळत नाही. देशात हुकूमशाही आणण्याचा यांचा डाव आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी केली. आम्ही अन्य काही सहन करू पण डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहलेल्या घटनेला हात लावलेले खपवून घेतले जाणार नाही. तुमचे सरकार उलथवून टाकू. विस्तावाशी खेळू नका, अशी मोदींवर टीका करतानाच हा आपल्याला प्रेमाचा सल्ला असल्याचेही त्यांनी नमूद केले.

मोदी सरकारने विकासाच्या अनेक योजना जाहीर केल्या ,पण त्यासाठी आर्थिक तरतूदच नाही. त्यासाठी या दिवट्या सरकारने रिझर्व्ह बँकेकडे निधीसाठी मोर्चा वळवला. स्वायत्तेवरील आक्रमक पसंत न झाल्याने त्यांच्याच गुजरात मधील उर्जित पटेल या गव्हर्नरनी राजीनामा देणे पसंत केले, अशा शब्दांत पवार यांनी सरकारच्या आर्थिक कामगिरीवर कोरडे ओढले.

मतांसाठी घोषणा करण्याचा यांना आवड आहे, पण एकाचीही पूर्तता केली जात नाही. सत्ता काळात राम मंदिर बांधले नाही तर संन्यास घेऊ असे म्हणणारे आता कोठे दिसत नाहीत. केवळ लोकांच्या भावनेशी खेळ केला जात आहे, अशी टीकाही पवार यांनी यावेळी केली.