पवार नावाच्या जाणत्या राज्याला आता बंद असलेलं रेल्वेचं इंजिन भाड्याने मिळतं. ते कितीही प्रयत्न केले तरी आता चालत नाही. राष्ट्रवादी काँग्रेस आता पराभूत मानसिकतेची पार्टी झाली असून या निवडणुकीनंतर ती दिसणारच नाही. या राष्ट्रीय अस्मितेच्या निवडणुकीनंतर फक्त आणि फक्त मोदींचे नेतृत्वच देशाने मोठ्या विश्वासाने उभे केल्याचे दिसून येईल असे, प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सातारा येथील प्रचार सभेत केले. महायुतीचे उमेदवार नरेंद्र पाटील यांच्या प्रचारार्थ ही सभा पार पडली.

फडणवीस म्हणाले, महाआघाडीचे खिचडी असलेले नेतृत्व आणि निर्णय शून्य राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसला देशद्रोह काय असतो हे माहीत नाही. सातारा जिल्ह्यातील अनेक सैनिक जम्मू-काश्मीर सीमेवर काम करताना अतिरेकी मारत असताना यांना देशद्रोही कोण हे दिसत नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचा मोदींना शिव्या देणे हा धंदाच आहे. या देशात फक्त मोदी गरिबी आणि विविध प्रश्नांसाठी लढले. ३४ हजार कोटी लोकांना त्यांच्या योजनांचा थेट खात्यात पैसे मिळून फायदा झाला. आम्ही भ्रष्ट बाबूगिरी आणि दुराचाऱ्यांच सरकार संपवलं. साखर कारखान्याचे, शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविले. मात्र, पवारांनी कृषी मंत्री असताना साखर कारखानदारांचे, इथेनॉलचे निर्णय न घेता दाबून ठेवले. सातारा जिल्ह्यातील अपूर्ण सिंचन प्रकल्प, शहरातील पालिकेच्या प्रकल्पांना निधी दिला. उदयनराजे तुम्ही तुमच्या सरकारच्या दहा वर्षात कोणताही निधी आणला नाही तो आम्हीच दिला हे तुमच्या नेत्यांना खरं खरं सांगा. आता राजेशाही राहू द्या सर्व सामान्यांचा उमेदवार नरेंद्र पाटील यांनाच विजयी करण्याचं आवाहन त्यांनी केले.

मदन भोसले म्हणाले, सातारा जिल्ह्यात २५० ते ३०० मिली मीटर पाऊस पडतो. तोच पाऊस खटाव माण फलटणकडे जाताना फक्त १५ टक्के होतो. पाऊस मोठ्या प्रमाणात असताना आजही आम्हाला पाण्यासाठी वणवण फिरावे लागते आहे. आमचे बंधुतुल्य मित्र उदयनराजे राजघराण्यातील असले तरी कर्तृत्व शून्य आहेत. त्यांचा लोकसभा सभागृहातील सहभाग शून्य टक्के आहे. त्यांनी मतदार संघातील कोणताही प्रश्न दहा वर्षात आत्मीयतेने सोडविला नाही.

यावेळी नरेंद्र पाटील यांनी उदयनराजे भोसलेंवर जोरदार टीका करत त्यांनी दहा वर्षात मतदार संघातील कोणतेही प्रश्न सोडविले नाहीत, असा आरोप केला. सातारा पालिकेच्या माध्यमातून मोठया प्रमाणात काळा बाजार सुरु आहे. सातारा जिल्ह्यातून मोठा महामार्ग जातो, टोलमधून जिल्ह्यातील वाहनांना टोल माफी व्हायला पाहिजे. मी मतदार संघातील सर्व प्रश्न सोडविणार आहे. जिल्ह्यातील मतदारांनी दहा वर्षात खासदार कोणाला दिसलेच नाहीत. ते सातारा, पुणे सोडून कधी दिल्लीत गेलेच नाहीत. कामे सेना-भाजपा सरकारच्या पैशांनी केली आणि आम्ही केली म्हणून ओरडत आहेत. यावेळी आम्ही कोणाला घाबरत नाही. आम्ही त्यांची दहशत संपविली आहे त्यांना मी या निवडणुकीत पडणार म्हणजे पडणारच असा निश्चय यावेळी नरेंद्र पाटील यांनी व्यक्त केला.