ठाण्यात शरद पवारांकडून उद्धव ठाकरे यांची खिल्ली

विविध निवडणुका १४ वेळा लढलो आणि त्यात एकदाही पराभव झाला नाही. पण, ज्यांनी कधी मैदानच पाहिले नाही, ते आमच्यावर मैदान सोडून पळाल्याची टीका करीत आहेत, असे सांगत बालका, एकदा तरी निवडणूक लढवून दाखव, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची खिल्ली उडवली.

ठाणे लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आनंद परांजपे यांच्या प्रचारासाठी पवार यांनी शुक्रवारी ठाण्यात जाहीर सभा घेतली. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे माझे मित्र होते. आम्ही भांडलो पण, दोघांनीही सलोखा सोडला नाही. परंतु आताचे पक्षप्रमुख उद्धव वेगळे आहेत, असे पवार म्हणाले.

‘विकासातील अपयशामुळे मतांसाठी राष्ट्रवादाचे धडे’

विकासाच्या बाबतीत सपशेल अपयशी ठरलेले नरेंद्र मोदी लोकांना राष्ट्रवादाचे धडे देऊन मते मिळविण्याचा प्रयत्न करीत आहेत. परंतु लोक आता खूप हुशार झाले आहेत, त्यांना राष्ट्रवाद काय, हे चांगले माहिती आहे. तो त्यांना शिकविण्याची गरज नाही, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शुक्रवारी लगावला.

गेल्या पाच वर्षांत राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) सरकारने शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविले नाहीत. बेरोजगारांच्या प्रश्नाकडे पाठ फिरवली. युवा शक्तीचा वापर केला नाही. आई-बहिणींच्या रक्षणासाठी ठोस काही केले नाही, असा आरोपही पवार यांनी केला. कल्याणमधील महाआघाडीचे उमेदवार बाबाजी पाटील यांच्या प्रीमिअर मैदानावरील सभेत पवार बोलत होते.