दयानंद लिपारे, कोल्हापूर

कोल्हापूर जिल्ह्य़ातील दोन्ही लोकसभा मतदारसंघातील आखाडय़ात आता खडाखडीला  सुरू झाली आहे. चार प्रमुख उमेदवारांचा राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याशी असलेल्या राजकीय संबंधाचा लंबक चकित करणारा आहे.

ज्यांनी राष्ट्रवादीच्या स्थापनेवेळी पवार यांना साथ दिली ते दुरावले आहेत, तर ज्यांनी टीकेचे कोरडे ओढले होते ते आता निकटचे सहकारी बनले आहेत.

राष्ट्रवादीचे खासदार धनंजय महाडिक – शिवसेनेचे संजय मंडलिक आणि खासदार राजू शेट्टी – शिवसेनेचे धैर्यशील माने या चौघांबाबतचा राजकीय आलेख हा असा ३६० अंशात वळणारा आहे. निवडणुकीच्या रणधुमाळीत या बदललेल्या राजकीय प्रवासाची आणि भूमिकेची खमंग चर्चा तालमींच्या कट्टय़ावर रंगली आहे.

शरद पवार राज्यात असोत की दिल्लीत  प्रत्येक जिल्ह्य़ातील घडामोडीवर त्यांची नजर असते. कोल्हापूर हा अनेक अंगानी त्यांच्या आवडीचा जिल्हा. आजोळ म्हणून. राजर्षी शाहूंच्या विचारांचा पुरस्कर्ता म्हणून. राजकीय वाटचालीला मोठी साथ देणारा म्हणूनही. कोल्हापुरात आताची त्यांची वाटचाल मात्र वेगळ्या वळणावर आहे.

जवळचे अंतरले, शत्रू मित्र बनले

राष्ट्रवादीच्या स्थापनेचा विचार शरद पवार यांनी मे १९९९ मध्ये बोलून दाखवला तेव्हा कोल्हापुरातून त्यांच्या हाकेला मोठा प्रतिसाद मिळाला. या ताकदीचा प्रत्यय लोकसभा निवडणुकीत आला. हातात घडय़ाळ घेतलेले सदाशिवराव मंडलिक (कोल्हापूर) आणि निवेदिता माने (हातकणंगले) यांनी सलग दोनदा विजय मिळवला. पुढे मंडलिक आणि पवार यांच्यात टोकाचे मतभेद निर्माण झाले. गेल्या निवडणुकीवेळी मंडलिक यांचे पुत्र संजय मंडलिक शिवसेनेतर्फे रिंगणात उतरले तेव्हा पवारांनी त्यांच्याविरुद्ध धनंजय महाडिक यांना उमेदवारी दिली. याच महाडिक यांच्या टोपण नावाचा आधार घेत पवार यांनी एकेकाळी ‘कौन है यह मुन्ना?’ अशी विचारणा केली होती. आता जिल्ह्य़ातील प्रमुखांचा विरोध असतानाही पुन्हा उमेदवारी देण्याइतपत ‘मुन्ना’ त्यांचे लाडके बनले आहेत, तर माजी खासदारपुत्र मंडलिक विरोधी तंबूत. हाच क्रम हातकणंगलेमध्येही. दोनदा पराभूत झालेल्या निवेदिता माने पवारांमुळे संसदेत पोहोचल्या, पण याच काळात राजू शेट्टी यांनी पवारांवर टीकास्त्र  डागणे सुरू ठेवले होते. तर, पवार शेट्टींना पाण्यात पाहात होते. काळाचा महिमा असा की या वेळी शेट्टी हे पवारांच्या जवळचे झाले आहेत, तर माजी खासदारपुत्र धैर्यशील माने विरोधकांकडून लढत आहेत.