राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार भाजपाविरोधी आघाडी भक्कम करण्याचे शक्य तितके सर्व प्रयत्न करत आहेत. रविवारी सातव्या अखेरच्या टप्प्याचे मतदान संपल्यानंतर एक्झिट पोलचे आकडे जाहीर झाले. त्यानंतर शरद पवार यांनी सत्ताधारी भाजपा आणि विरोधी पक्षांच्या आघाडीपासून लांब असलेल्या तीन पक्षांशी संपर्क साधला. हिंदुस्थान टाइम्सने हे वृत्त दिले आहे.

शरद पवार बीजू जनता दल, तेलंगण राष्ट्र समिती आणि वायएसआर काँग्रेसच्या संपर्कात आहेत. या तीन पक्षांना काँग्रेस प्रणीत संयुक्त पुरोगामी आघाडीसोबत जोडण्याचे शरद पवारांचे प्रयत्न सुरु आहेत. वायएसआरसीपीचे सर्वेसर्वा जगनमोहन रेड्डी परदेशात असल्यामुळे त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. शरद पवारांनी ओदिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक, तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्याशी चर्चा केल्याची माहिती राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याने दिली.

हैदराबादच्या बाहेर असलेल्या एका फार्महाऊसमध्ये के. चंद्रशेखर राव आणि शरद पवार यांच्यामध्ये चर्चा झाली. त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाली तर संयुक्त पुरोगामी आघाडीला पाठिंबा देण्याचे चंद्रशेखर राव यांनी आश्वासन दिले आहे असे राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याने सांगितले. टीआरएसचे राज्यसभेतील खासदार जे. संतोष कुमार यांनी केसीआर यांची शरद पवारांबरोबर चर्चा झाल्याचे वृत्त फेटाळून लावले आहे.

पवारांची ओदिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांच्या बरोबर सुद्धा सकारात्मक चर्चा झाली. आकडे अनुकूल असतील तर त्यांचा सुद्धा पाठिंबा मिळू शकतो असे राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याने सांगितले. शरद पवार भाजपा आणि एनडीएसोबत नसलेल्या पक्षांना आपल्यासोबत जोडण्याचा प्रयत्न करत आहेत.