लोकसभा निवडणुकीची मतमोजणी सुरु असून बहुतांश ठिकाणी भाजपचे उमेदवार आघाडीवर आहेत. मोदी लाट कमी झाली किंवा मावळली असे म्हणणाऱ्या विरोधकांना या कलांमुळे पुन्हा एकदा चिंतेत टाकले आहे. मात्र पुन्हा एकदा बहुमताचे सरकार येणार असे दिसत असल्याने शेअर बाजार तर तेजीत दिसत असून पहिल्यांदाच सेन्सेक्सने ४० हजारांपार मजल मारली आहे. इतिहासात पहिल्यांदाच सेन्सेक्स ४० हजारांवर, स्थिर सरकार येण्याची चिन्हे दिसू लागले असताना शेअर बाजारात ही उसळी दिसून आली आहे.

केंद्रात पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार येण्याच्या आशेने एक्झिट पोलच्या कलानंतर शेअर बाजारात उत्साह दिसून आला होता. २० मे रोजी सकाळी शेअर बाजार सुरु होताच सेन्सेक्सने ऐतिहासिक उच्चांक गाठला होता. सेन्सेक्सने ३९ हजार ५५४. २८ चा पल्ला गाठला होता. या उच्चांकाचा विक्रम मोडीत काढत आज स सेन्सेक्सने नवा उच्चांक स्थापित केला. आजच्या दिवसभरात सेन्सेक्सने ४० हजार १२४.९६ चा आकडा गाठला. तसेच निफ्टीही १२ हजार अंकाच्या पुढे गेला.

सार्वत्रिक निवडणुकीच्या अंतिम टप्प्यानंतर रविवारी जाहीर झालेल्या एक्झिट पोलमध्ये केंद्रातील राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारच्या निर्विवाद यशाच्या अंदाजाचे पडसाद उमटले होते. त्यावेळी सेन्सेक्स सोमवारी ३९ हजार ३५२.६७ वर तर निफ्टी ११ हजार ८२८.२५ पर्यंत स्थिरावला होता. त्याहीपेक्षा मोठी मुसंडी आज शेअर बाजारात दिसून आली.