शिरुर लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अमोल कोल्हे यांच एक रोमँटिक प्रेम गीत हे पन्हाळा गडावर चित्रित झालं होतं. या प्रेम गीतामुळे गडाचं पावित्र्य राखलं गेलं नाही. त्यामुळे अमोल कोल्हे यांनी जाहीर माफी मागावी अशी मागणी शिवसेनेच्या जिल्हा संघटक सुलभा उबाळे यांनी केली आहे. पाच फेब्रुवारी २०१६ रोजी अमोल कोल्हे यांचा मराठी टायगर्स नावाचा चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्यातील रोमँटिक प्रेम गीत हे पन्हाळा गडावर चित्रित झालं होतं.

छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज काही दिवस या गडावर वास्तव्यास होते. त्यामुळे अमोल कोल्हे यांच्या रोमँटिक प्रेम गीतामुळे गडाचं पावित्र्य राखलं गेलं नाही असं उबाळे यांच म्हणणं आहे. त्यामुळे या प्रकरणी त्यांनी जाहीर माफी मागावी अशी मागणी शिवसेनेच्या जिल्हा संघटक सुलभा उबाळे यांनी केली आहे.

सुलभा उबाळे म्हणल्या की, शिवसेनेचे शिरूर लोकसभेचे उमेदवार शिवाजी आढळराव पाटील यांच्यावर अमोल कोल्हे यांनी विकासासंबंधी टीका करावी तसेच आरोप प्रत्यारोप करावेत. मात्र ते प्रत्येक वेळी आपल्या भाषणातून संभाजी महाराज यांचा भक्त असल्याचं भासवून नागरिकांची दिशाभूल करत आहेत. ते उत्तम कलाकार आहेत, चांगले राजकारणी ही होऊ शकतात.

मात्र तुम्ही शंभू भक्त आहात की कलाकार हे स्पष्ट करावं. एकीकडे भारतीय पुरातत्व विभागाची परवानगी न घेता छत्रपती शिवाजी महाराज याच वास्तव्य असणाऱ्या पन्हाळा गडावर तुम्ही रोमँटिक प्रेम गीत चित्रित करता. जो व्यक्ती छत्रपतींच्या नावाने मोठा झाला त्यांनी अशा प्रकारे ऐतिहासिक दृष्ट्या महत्वाच्या किल्ल्यावर ५७ लाख रुपये घेऊन रोमँटिक गाण्यासाठी वापर करावा ही सर्वांसाठीच चीड येणारी बाब आहे असं उबाळे म्हणाल्या.