News Flash

कल्याणमध्ये शिवसेना आक्रमक

प्रचार करताना शिवसैनिक कोणाचेही नाव घेत नसले तरी ही भूमिका नेमकी कोणाविषयी आहे, याची चर्चा या पट्टय़ात रंगली आहे.

(संग्रहित छायाचित्र)

भगवान मंडलिक

‘संपत्ती विरुद्ध स्वाभिमान’ ब्रीद घेऊन कार्यकर्त्यांकडून गल्लोगल्ली प्रचार

समाजमाध्यमाद्वारे ‘आपलं ठरलंय’ असा प्रचार करीत बदलापूर, मुरबाड आणि शहापूर पट्टय़ातील शिवसैनिकांनी भावनांना वाट मोकळी करून दिली आहे. याच वेळी कल्याण पश्चिमेत शिवसेनेच्या काही नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी ‘संपत्ती विरुद्ध स्वाभिमान’ असे ब्रीद घेऊन गल्लोगल्ली प्रचार सुरू केला आहे.

हा प्रचार करताना शिवसैनिक कोणाचेही नाव घेत नसले तरी ही भूमिका नेमकी कोणाविषयी आहे, याची चर्चा या पट्टय़ात रंगली आहे. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशामुळे शिवसेनेचे बहुतांश नगरसेवक पाटील यांच्या प्रचारात सक्रिय दिसत असले तरी त्यांचे निकटचे कार्यकर्ते मात्र कल्याण खाडीत कमळाचे विसर्जन करा, असे आवाहन दबक्या सुरात करताना दिसू लागले आहेत.

दरम्यान, कल्याण पश्चिमेतील शिवसैनिकांचा हा कडवा निर्धार पाहून भाजपच्या नेत्यांनी दगाफटका नको म्हणून डोंबिवली, टिटवाळा भागातील सर्व नगरसेवक, संघ स्वयंसेवकांना या भागात प्रचारासाठी उतरविले आहे.

कल्याण पश्चिमेत संघ कार्यकर्त्यांचे मोठे जाळे पसरले आहे. महापालिकेत या भागातून शिवसेनेचे नगरसेवक मोठय़ा संख्येने निवडून येत असले तरी भाजपकडून संघ कार्यकर्त्यांची फळी स्वतंत्ररीत्या कार्यरत केली जात आहे. चार वर्षांपूर्वी कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीदरम्यान खासदार पाटील यांनी शिवसेनेचे काही उमेदवार पाडण्यासाठी मोठी रसद या भागात पुरविण्यात आली होती. पाटील यांनी त्यांची माणसे लावून शिवसेनेचे उमेदवार पाडण्याचा जो ‘उद्योग’ केला त्याची पुरती किंमत आम्ही लोकसभा निवडणुकीत चुकती करायला लावू, अशी इशारेवजा भाषाही पक्षाच्या काही नगरसेवकांनी सुरू केली आहे.

विकासकामांकडे पाठ

खासदार पाटील यांनी भिवंडी परिसरातील गावांसाठी मुख्यमंत्र्यांमार्फत कोटय़वधी रुपयांचा निधी आणला. कल्याणमध्ये त्यांनी दाखविण्यासारखे कोणते काम केले, असा सवाल शिवसेनेचे काही पदाधिकारीच खासगीत करीत आहेत. २०१५ मध्ये २७ गावे पालिकेत समाविष्ट झाली. त्या वेळी पाटील यांनी पुढाकार घेऊन हद्दवाढीचा सुमारे ४०० कोटी रुपयांचा निधी पालिकेला मिळून देणे आवश्यक होते. कल्याण ते कसारापर्यंत दहांहून अधिक रेल्वे स्थानक पाटील यांच्या हद्दीत आहेत. तेथील प्रवासी, रेल्वे स्थानकांवरील समस्या पाटील यांनी किती प्रमाणात मार्गी लावल्या, असा सवाल केला जात असून या वेळी धनशक्तीला घरी बसवा, असा आक्रमक प्रचार शिवसेनेचे पदाधिकारी करू लागले आहेत. याप्रकरणी पक्षाचे कल्याण विभागाचे जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांच्याशी वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही. भाजपचे उमेदवार कपिल पाटील यांनीही प्रतिसाद दिला नाही. दरम्यान, काही ठरावीक शिवसैनिक नाराज दिसत असले तरी नगरसेवकांनी मात्र पूर्ण जोमाने पाटील यांच्या प्रचाराची धुरा खांद्यावर घेतली आहे, अशी प्रतिक्रिया शिवसेनेच्या एका नेत्याने नाव न जाहीर करण्याच्या अटीवर दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 20, 2019 12:25 am

Web Title: shiv sena aggressor in kalyan
Next Stories
1 आघाडीच्या प्रचारासाठी मनसेच्या रविवारपासून चौकसभा
2 शहीद करकरे यांना वंचित आघाडीच्या सभेत श्रद्धांजली
3 दाभोलकरांचे मारेकरी सापडले असते तर त्यांनाही भाजपाने उमेदवारी दिली असती : अजित पवार
Just Now!
X