कोल्हापूर, हातकणंगले, साताऱ्याच्या विद्यमान खासदारांपुढे आव्हान

दयानंद लिपारे, कोल्हापूर</strong>

एकेकाळी काँग्रेस- राष्ट्रवादीचा अभेद्य गड मानल्या जाणाऱ्या पश्चिम महाराष्ट्रात भाजप-शिवसेना युतीने आव्हान उभे केले असून, कोल्हापूर आणि सातारा या राष्ट्रवादीकडे असलेल्या तर हातकणंगले या ‘स्वाभिमानी’कडे असलेल्या मतदारसंघांतील विद्यमान खासदारांपुढे पुन्हा निवडून येण्याचे आव्हान आहे.

पश्चिम महाराष्ट्रात पूर्वापार काँग्रेसचे वर्चस्व राहिले आहे. राष्ट्रवादीच्या उदयानंतर काँग्रेसचे दोन समांतर प्रवाह एकमेकांशी चढाओढ करीत वाहू लागले. गेल्या २० -२५ वर्षांत हळूहळू शिवसेना- भाजपचा शिरकाव होऊ लागला. गेल्या लोकसभा- विधानसभा निवडणुकीनंतर युतीची मुद्रा अधिक ठळक बनत गेली.

स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये स्वतंत्र लढवूनही युतीला लक्षणीय यश मिळाले. यशाची ही चढती कमान आता दिल्लीपर्यंत पोहचावी यासाठी लोकसभा निवडणुकीसाठी व्यूहरचना केली आहे. त्यासाठी तगडय़ा उमेदवारांना रिंगणात उतरवण्याची खेळी केली आहे. अर्थात, त्यासाठी आयारामांसाठी पायघडय़ा अंथराव्या लागल्या आहेत. महाआघाडीच्या जागावाटपात या तिन्ही जागा राष्ट्रवादीकडे आल्या असल्याने विद्यमान खासदारांना पुन्हा आखाडय़ात उतरवले आहे.

बदलत्या सत्ताकारणात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने महाआघाडीशी साथसोबत केली असून राष्ट्रवादीच्या कोटय़ातील हातकणंगलेची जागा खासदार शेट्टी यांच्यासाठी सोडली असल्याने त्यांचे पालकत्व राष्ट्रवादीकडे आले आहे.

कोल्हापूरचा आखाडा चुरशीचा

राष्ट्रवादीचे धनंजय महाडिक यांच्याविरोधात शिवसेनेने पुन्हा संजय मंडलिक यांना उमेदवारी दिली आहे. काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांचे बळ शिवसेनेच्या मंडलिक यांच्यामागे उभे राहिल्याने सुरुवातीलाच त्यांना मोठा आधार मिळाला. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील हे महाडिक यांच्या प्रेमाला जागणार अशी चर्चा प्रारंभी होती, पण आता मंत्री पाटील यांनी महाडिक यांच्यावर प्रहार करण्यास सुरुवात केली आहे. शिवसेना – भाजपचाच एकसंघ प्रचार ही मंडलिक यांची जमेची बाजू. मात्र, भाजपचे आमदार अमल महाडिक, जिल्हा परिषद अध्यक्षा शौमिका महाडिक आणि भाजप- ताराराणी आघाडीच्या तीन डझन नगरसेवकांनी घडाळ्याची टिकटिक सुरु ठेवल्याने मंडलिक यांच्या अडचणी वाढल्या आहेत. एकूण चित्र पाहता कोल्हापुरात काटाजोड कुस्तीला रंग चढला आहे.

हातकणंगलेच्या शिवारात रंगत

मोठय़ा निवडणुकांमध्ये चळवळीतील कार्यकर्ते अस्तंगत होत चालले असताना राजू शेट्टी यांनी मात्र आपला प्रभाव टिकवला आहे. त्यांचा हा प्रभाव कितपत उरला आहे, याचा फैसला हातकणंगले लोकसभा मतदारसंघात यंदा दिसणार आहे. शिवसेनेचे तरुण उमेदवार धैर्यशील माने यांच्या मागे शिवसेना – भाजपची ताकद उभी असल्याने त्यांचा प्रभाव दिसू लागला आहे. मतदारसंघात युतीचे पाच आमदार आणि मोठी यंत्रणा कार्यरत झाली असल्याने शेट्टींसमोर आव्हान आहे. उत्तरेतील योगेंद्र यादवांपासून ते कर्नाटकातील अभिनेता प्रकाश राज यांच्यापर्यंत चळवळीतील कार्यकर्त्यांना शेट्टींची उमेदवारी आपली आहे, असे वाटत असल्याने त्यांनी प्रचारात झोकून दिले आहे. खेरीज, काँग्रेस- राष्ट्रवादीतील प्रमुख नेते आणि सहकार सम्राट प्रथमच शेट्टींच्या प्रचारात उतरल्याने हातकणंगलेच्या शिवाराला वेगळीच रंगत आली आहे.

सातारा ‘राजां’ना साथ देणार?

साताऱ्यातील लोकसभेची गादी टिकवण्याचा उदयनराजे भोसले यांचा प्रयत्न आहे. त्यांच्या विरोधात माथाडीनेते नरेंद्र पाटील यांनी आव्हान उभे केले आहे. प्रारंभी राजेंच्या विरोधात सरदारांनी संघर्षांचा पवित्रा घेतला होता, पण पवारांनी समेट केल्यानंतर काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आमदारांनी कार्यकर्त्यांसह प्रचारात झोकून दिल्याने उदयनराजेंना धीर आला आहे. नरेंद्र पाटील यांचे माथाडी कामगार हे बलस्थान. त्याला छेद देण्यासाठी आमदार शशिकांत शिंदे यांनी माथाडी बहुल भागातील प्रचारावर जोर दिला आहे. नरेंद्र पाटील यांचा नवा चेहरा लोकांसमोर प्रभावी पद्धतीने सादर करण्याचे महायुतीचे नियोजन आहे. प्रचारात उणीव राहणार नाही याची दक्षता घेतली जात आहे. पाटील यांनी तर उदयनराजे यांच्या वैगुण्यांवर बोट ठेवून मतदारांना आकर्षित करण्याची मोहीम आखली आहे. हा सामना रंगात असताना उदयनराजेंना पुन्हा गादी मिळणार का याची उत्सुकता सर्वानाच आहे.

पवारांमुळे प्रचार सुरळीत

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी या तिन्ही लोकसभा मतदारसंघांना विशेष प्राधान्य दिले आहे. गेल्या दोन महिन्यांत पवारांची पाचवेळा कोल्हापूरकडे पावले वळली आहेत. उदयनराजे, महाडिक आणि शेट्टी या तिघांसाठी त्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.  दोन्ही काँग्रेसमधील पवार एकटेच असे नेते आहेत ज्यांनी पायाला भिंगरी बांधून प्रचाराला वाहून घेतले आहे. प्रचार आणि समन्व्ययातील त्रुटी दूर करून मित्रपक्षांच्या एकसंघ प्रचारासाठी त्यांनी नियोजनबद्ध पावले टाकल्याने प्रारंभी विस्कळीत वाटणारा प्रचार शेवटच्या टप्प्यात सुरळीत होताना दिसत आहे.