नागरी समस्या सोडविण्यात शिवसेना पूर्णपणे अपयशी!

संजय निरुपम, काँग्रेस</strong>

(संग्रहित छायाचित्र)

आपण उत्तर मुंबई मतदारसंघ बदलून उत्तर पश्चिम मतदारसंघात निवडणूक लढवीत आहात. याबद्दल तुमचे पक्षांतर्गत विरोधक टीका करतात..

माझे वास्तव्य याच मतदारसंघात आहे. गुरुदास कामत हे उत्तर पश्चिममधून निवडणूक लढवत असत म्हणून मी शेजारील मतदारसंघातून निवडणूक लढविली होती. कामत यांच्या निधनानंतर पक्षाला अन्य पर्यायाचा विचार करावा लागणार होता. यामुळेच मी पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांच्याकडे या मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली. राहुल यांच्या मान्यतेनंतरच मला पक्षाने या मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे.

विद्यमान शिवसेना खासदार गजानन कीर्तिकर यांच्या कामगिरीविषयी काय मत आहे?

उत्तर पश्चिम मुंबई मतदारसंघाचा अभ्यास केला असता या भागात नागरी समस्याच सोडविण्यात आलेल्या नसल्याचे आढळून आले. झोपडपट्टय़ांमध्ये गटारे नाहीत. स्वच्छतेचा अभाव आहे. पिण्याचा पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. सर्वत्र घाणीचे साम्राज आहे. शिवसेना महानगरपालिकेत गेली अनेक वर्षे सत्तेत आहे. या भागातील खासदार शिवसेनेचा, आमदारही युतीचे आहेत. तरीही मतदारसंघातील साधे साधे नागरी प्रश्न सोडविण्यात शिवसेनेला अपयश आले. निवडून आल्यावर खासदार निधीतून मतदारसंघातील नागरी प्रश्न सोडविणार आहे.

मुंबईतील सर्वात महत्त्वाचा रेल्वे किंवा वाहतूक प्रश्न सोडविण्यासाठी तुमची योजना काय आहे?

उच्च गुणवत्तेचे रस्ते, मेट्रो, बेस्ट आणि महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पाचे एकीकरण करून बेस्ट या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला प्राधान्य आणि नवीन बसेस खरेदी करण्याचा पाठपुरावा, लोखंडवाला कॉम्प्लेक्स व यारी रोडदरम्यान रस्ता बांधणार, गोरेगाव-मुलुंड लिंक रोडचे काम जलद गतीने पूर्ण करण्याकरिता पाठपुरावा आदी कामे करण्यावर आपला भर राहील. भाजपा-शिवसेना सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे वाहतूक व्यवस्थेचा बट्टय़ाबोळ झाला असून, मुंबईकरांना त्याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. हे सारे चित्र बदलण्यावर आपला भर राहील.

तुम्हाला मतदारांनी का निवडून द्यावे?

लोकसभेची निवडणूक ही राष्ट्रीय प्रश्नावर होते; पण यात स्थानिक प्रश्नही महत्त्वाचे असतात. राष्ट्रीय पातळीवर मोदी सरकारच्या धोरणांमुळे उद्योग, व्यापारी, नोकरदार वर्ग या साऱ्यांचे नुकसान झाले. रोजगाराच्या संधी घटल्या ही सरकारची आकडेवारीच सांगते. नोटाबंदीचे परिणाम अजूनही भोगावे लागत आहेत. लघुउद्योजकांना फटका बसला. राष्ट्रीय प्रश्नांवर सर्वच आघाडय़ांवर मोदी सरकार अपयशी ठरले आहे. स्थानिक प्रश्नावरही शिवसेना-भाजपच्या मर्यादा स्पष्ट झाल्या. वर्षांनुवर्षे महानगरपालिकेत शिवसेना सत्तेत आहे; पण मुंबईचे प्रश्न सोडविण्यात शिवसेनेला अपयश आले आहे. या पाश्र्वभूमीवर मतदार शिवसेना वा मोदी यांना मते देणार नाहीत.

पुढील पाच वर्षांत कोणती कामे करणार?

काँग्रेस पक्षाच्या जाहीरनाम्याबरोबरच उत्तर पश्चिम मुंबईचा स्वतंत्र जाहीरनामा मी प्रसिद्ध केला आहे. हा जाहीरनामा मराठी, हिंदी, इंग्रजी, गुजराती या भाषांमधून मतदारसंघात वाटण्यात आला आहे. गृहनिर्माण, महिला, वाहतूक, पर्यावरण, गावठाणे आणि कोळीवाडे या अशा महत्त्वाच्या प्रश्नांवर काम करणार आहे. झोपडपट्टी पुनर्विकास योजनेंतर्गत ५०० चौरस फुटांचे मोफत घरे देण्याचे आश्वासन राहुल गांधी यांनी मुंबईकरांना दिले आहे. सीआरझेडमधील जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाला प्राधान्य देण्यात येईल. लोकांना जास्तीत जास्त सुविधा मिळाव्यात यावर भर राहील.

केंद्रीय विद्यालय, ‘एम्स’ आणायचे आहे!

गजानन कीर्तिकर, शिवसेना

(संग्रहित छायाचित्र)

गेल्या पाच वर्षांत मतदारसंघात उपयुक्त ठरतील अशी कोणती ठळक कामे केलीत?

माझ्या मतदारसंघातील लोकांचा रेल्वेशी रोज संबंध येतो. त्यामुळे खासदार झाल्यावर अंधेरी, जोगेश्वरी, राम मंदिर, गोरेगाव या रेल्वे स्थानकांत अधिकाधिक सुविधा पुरविण्यासाठी गेल्या पाच वर्षांत कंबर कसली. वयोवृद्ध, अपंग आदींसाठी सरकते जिने, रेल्वेसाठी ताटकळत असलेल्या प्रवाशांसाठी फलाटावर सुविधा, पादचारी पुलांची संख्या वाढवून ते रुंद अशी किती तरी महत्त्वाची कामे केली. हार्बर रेल्वे गोरेगावपर्यंत नेणे, राम मंदिर हे नवे स्थानक, बाहेरगावी जाणाऱ्या प्रवाशांसाठी प्रतीक्षालय, मॉडेल स्थानकांमध्ये अंधेरी व गोरेगावचा समावेश, फलाटांची उंची आदी किती तरी कामांची यादी देता येईल. याशिवाय माझा संपूर्ण खासदार निधी मतदारसंघातील विविध कामांसाठी वापरला. वेसावे येथील समुद्रातील गाळ काढण्यासाठी ८० कोटींची तरतूद करून घेतली. त्यामुळे मच्छीमारांना किनाऱ्याजवळच मासेमारी करणे शक्य होईल. याशिवाय अत्याधुनिक जेट्टी उभारणीसाठी ३५० कोटी खर्च केले जाणार आहेत. सीआरझेड हा महत्त्वाचा विषय मार्गी लावल्यामुळे अनेक जुन्या तसेच म्हाडा इमारतींचा प्रश्न मार्गी लागला आहे.

मुंबईतील रेल्वे किंवा रस्ते वाहतुकीचा प्रश्न सोडविण्यासाठी आपल्याकडे योजना आहे का?

या मतदारसंघात मी नवीन नाही. २० वर्षे आमदार आणि आता पाच वर्षे खासदार म्हणून काम करताना या मतदारसंघाला भेडसावणारा रस्ते आणि रेल्वे वाहतुकीकडेच मी लक्ष केंद्रित केले. त्यानुसार पश्चिम रेल्वेवर पाचवा व सहावा मार्ग २०२० पर्यंत टाकला जाणार आहे. त्यानंतर निश्चितच उपनगरीय सेवा अधिक सक्षम झालेली असेल. सध्या माझ्या मतदारसंघात मेट्रोच्या सात लाइन्सचे तसेच सागरी महामार्गाचे कामही सुरू झाले आहे. त्यामुळे रस्ते वाहतुकीचा प्रश्नही निश्चितच मार्गी लागणार आहेत.

तुम्हाला मतदारांनी पुन्हा का निवडून द्यावे?

माझ्यासारख्या सामान्य माणसाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी पहिल्यांदा संधी दिली. त्यानुसार मी सतत कार्यरत राहिलो. माझ्या कार्यालयाचे दरवाजे नागरिकांना सताड उघडे आहेत. खासदार म्हणून मतदारसंघातील समस्या सुटाव्यात यासाठी प्रयत्न केले. संसदेत उपस्थित राहून १०१८ प्रश्न विचारले. ७७ वेळा चर्चेत सहभाग घेतला. देशात दोन इतकी सरासरी असतानाही मी आठ खासगी विधेयके आणू शकलो. खासदार म्हणून मी माझ्या निवडीला पूर्णपणे न्याय दिला आहे. त्यामुळे लोकांनी मला पुन्हा संधी द्यावी. म्हणजे अपूर्ण राहिलेली कामे पूर्ण करता येतील.

पुढील पाच वर्षांसाठी तुमच्याकडे कोणत्या योजना आहेत?

माझ्या मतदारसंघात केंद्रीय विद्यालय, अखिल भारतीय वैद्यकीय विज्ञान संस्था यांची स्थापना करायची आहे. गेल्या पाच वर्षांत मी त्या दिशेने प्रयत्न केले आहेत. त्याला मूर्तस्वरूप देण्याचा माझा प्रयत्न आहे. केंद्र सरकारच्या अखत्यारीतील विविध कार्यालये या मतदारसंघात आहेत. या कार्यालयांच्या भूखंडावरही झोपडय़ा वसल्या गेल्या आहेत. त्यांचे पुनर्वसन व्हावे, यासाठीही आपण प्रयत्नशील राहणार आहोत. रेल्वे वाहतुकीचा शंभर टक्के प्रश्न निकालात काढणार आहे. नैसर्गिक आपत्तीची सूचना मिळावी, यासाठी उपनगरात अंधेरी पूर्वेतील वेरावली पंपिंग स्टेशन येथे डॉपलर रडार बसविण्यात येणार आहे.

प्रतिस्पर्धी उमेदवाराबद्दल..

निवडणुकीत हार-जीत असते. त्यासाठी प्रचारात खालची पातळी गाठणे योग्य नाही. विनाकारण बदनामी करू नका. मराठी-उत्तर भारतीय वाद उकरून काय फायदा? हिंमत असेल तर ताकदीने लढा. माझ्या त्यांना शुभेच्छा.