सुमारे चाळीस वर्षांपूर्वी शिवसेनेने एकही जागा न लढवता काँग्रेसला जाहीर पाठींबा दिला होता, त्यांचाच वारसा राज ठकारेंही चालवत आहेत. मग त्यांच्या नावाने शिमगा का करता? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी शिवसेनेला केला आहे. ट्विट करुन त्यांनी आपली भुमिका मांडली.


१९८० सालच्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेने एकही जागा लढवली नव्हती. या निवडणुकीत शिवसेनेने काँग्रेसला समर्थन देखील दिलं होत. त्यांचाच कित्ता गिरवत आज राज ठाकरे देखील एकही जागा लढवत नाहीत, तसेच त्यांनीही काँग्रेस-राष्ट्रवादीला जाहीर पाठींबा दिला आहे. त्यामुळे त्यांच्या नावाने शिमगा करणाऱ्या लेकरांसाठी ही खास माहिती…!, असं ट्विट करीत त्यावेळच्या मार्मिकमध्ये आलेल्या लेखाचे छायाचित्र आव्हाड यांनी ट्विटमध्ये वापरलं आहे.

मनसे यंदाच्या लोकसभा निवडणुकीत एकही जागा लढवत नाहीए. तसेच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काँग्रेस-राष्ट्रवादी महाआघाडीचा प्रचार करणार असल्याचेही जाहीर केले आहे. त्यासाठी ते राज्यात ९ ठिकाणी आघाडीसाठी प्रचार सभाही घेणार आहेत. नुकत्याच झालेल्या मनसेच्या पाडवा मेळाव्यात राज ठाकरेंनी त्याची चुनूकही दाखवली. त्यांच्या या भाषणाची चांगलीच चर्चाही झाली होती. दरम्यान, शिवसेना-भाजपाकडून मनसेने आघाडीला साथ देण्यावरुन टीका केली आहे. यापार्श्वभूमीवर जितेंद्र आव्हाड यांनी सेनेला आरसा दाखवला आहे.