शिवसेनेत जात आणि धर्म पाहून तिकिट दिलं जात नाही. ज्यांची पुढे यायची इच्छा असते ते पुढे येतातच असं युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे. युवाटूयुवा या संवाद कार्यक्रमात आदित्य ठाकरे यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.

शिवसेना हा असा पक्ष आहे ज्या पक्षाची सुरुवात एका व्यंगचित्रकाराने केली. त्यामुळे आम्ही जातीपातीचं राजकारण करत नाही. आमची सुरुवात शून्यापासून झाली. माझ्या आजोबांनी जेव्हा शिवसेना सुरु केली तेव्हा त्यांच्या हाती सत्ता नव्हती. त्यामुळे त्यांनी शिवसेना उभारताना जातीपातीचा किंवा धर्माचा विचार केला नाही असंही आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे.

पहा व्हिडिओ

लोकसभा निवडणुकांच्या रणधुमाळीत आता प्रचाराच्या विविध पद्धती अवलंबल्या जात आहेत. शिवसेनेच्या ट्विटर हँडलवर आदित्य ठाकरे यांच्या मुलाखतीचा हा भाग पोस्ट करण्यात आला आहे. राजकारणातील समानता आणि निःपक्षपात हा शिवसेनेत आहे असं या पोस्टमध्ये म्हटलं आहे. आदित्य ठाकरे हे हिंदीतून संवाद साधत आहेत. शिवसेनेने कधीही जात-पात आणि धर्म पाहून कुणालाही तिकिट दिलं नाही. शून्यातून सुरु झालेल्या या पक्षाने जाती धर्माचं राजकारण केलं नाही ज्याला पुढे येण्याची इच्छा होती तो शिवसेनेत पुढे आलाच असं आदित्य ठाकरेंनी म्हटलं आहे.