प्रचारात राष्ट्रवादी नेते मात्र सावध भूमिकेत

सागर नरेकर, बदलापूर

भाजपला धोबीपछाड देत राष्ट्रवादीच्या मदतीने ठाणे जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद पटकाविणाऱ्या शिवसेनेने जिल्हा परिषदेतील राजकारणात सध्या तरी राष्ट्रवादीशी काडीमोड घ्यायचा नाही, असा निर्णय घेतला असून या घडामोडींमुळे अस्वस्थ असलेले भाजप नेतेही लोकसभा निवडणुकीतील राजकीय समीकरणे पाहून या मुद्दय़ावर सावध भूमिका घेताना सध्या दिसत आहेत. दुसरीकडे शिवसेनेच्या मदतीवर जिल्हा परिषदेचे उपाध्यक्षपद पटकाविणाऱ्या राष्ट्रवादीचीही नव्या राजकीय घडामोडींमुळे कोंडी झाल्याचे चित्र असून महाआघाडीच्या प्रचारात या नेत्यांनी सावध भूमिका घेतल्याचे चित्र आहे.

वर्षभरापूर्वी झालेल्या ठाणे जिल्हा परिषद निवडणुकीत शिवसेना आणि भाजप एकमेकांविरुद्ध लढले होते. अखेरच्या क्षणी शिवसेनेने बाजी मारत ठाणे जिल्हा परिषदेच्या ५३ पैकी २६ जागा जिंकल्या होत्या. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मेहनतीमुळे भाजपला अवघ्या १० जागांवर रोखण्यात शिवसेनेला यश आले होते. त्यानंतर सत्तेपासून भाजपला दूर ठेवण्यासाठी पालकमंत्री शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या १५ सदस्यांना सत्तेत सहभागी करून राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुभाष पवार यांना उपाध्यक्षपद दिले होते. वर्षभरापासून ठाणे जिल्हा परिषदेत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीची सत्ता आहे.

मात्र लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने सत्तेतील हे दोन्ही पक्ष एकमेकांविरुद्ध उभे ठाकले आहेत. कल्याण लोकसभा मतदारसंघात शिवसेनेच्या डॉ. श्रीकांत शिंदेंसमोर राष्ट्रवादी काँग्रेसचे बाबाजी पाटील रिंगणात आहेत, तर भिवंडी मतदारसंघात भाजपच्या कपिल पाटील यांच्याविरुद्ध काँग्रेसचे सुरेश टावरे मैदानात आहेत.

त्यामुळे मुरबाड, कल्याण, अंबरनाथ, शहापूर तालुक्यांच्या ग्रामीण भागात शिवसेना आणि भाजपविरुद्ध प्रचार कसा करावा अशा चिंतेत राष्ट्रवादीचे नेते आहेत.

मुरबाड विधानसभा मतदारसंघात जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुभाष पवार यांची मोठी कोंडी झाली आहे. भाजपविरुद्ध प्रचार करायचा तर पालकमंत्री एकनाथ शिंदे हे दुखावले जातील.

प्रचार नाही केला तर आघाडीवर परिणाम होईल. तसेच येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत प्रमुख दावेदार असल्याने त्यातही मागे पडण्याची भीती आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे नेते द्विधा मन:स्थतीत असल्याचे चित्र आहे. याबाबत जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुभाष पवार यांना विचारले असता, आघाडीचा प्रचार करत असताना कोणताही दबाव नसल्याची प्रतिक्रिया देत त्यांनी यावर अधिक बोलणे टाळले.

शिवसेनेचेही आस्ते कदम

भिवंडी लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार कपिल पाटील यांच्याबद्दल राष्ट्रवादीच्या नेत्यांना फारसे ममत्व नाही. त्यामुळे जिल्हा परिषदेत पालकमंत्र्यांचा आघाडीचा प्रस्ताव वर्षभरापूर्वी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी तात्काळ स्वीकारला होता. ही आघाडी व्हावी यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार स्वत: आग्रही होते. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत जरी शिवसेना-भाजपची युती झाली असली तरी जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीला दुखवून चालणार नाही. असाच चुकीचा संदेश जाईल, अशी भूमिका काही शिवसेना नेत्यांनी पालकमंत्र्यांपुढे मांडल्याचे समजते.