09 December 2019

News Flash

मराठवाडय़ात शिवसेना-राष्ट्रवादीत चुरस

औरंगाबाद आणि जालना या दोन मतदारसंघांत काँग्रेसने दिलेले उमेदवार कमकुवत आहेत, अशी टीका पक्षातील काही नेत्यांनी केली.

(संग्रहित छायाचित्र)

सुहास सरदेशमुख

एका बाजूला दुष्काळ, टंचाई, वाळून गेलेल्या फळबागा असा भवताल असणाऱ्या मराठवाडय़ातील लोकसभा निवडणुकीत मात्र कोणताही प्रमुख मुद्दा निवडणुकीच्या केंद्रस्थानी आलेला नाही. नांदेड वगळता विस्कळीत झालेली काँग्रेस, उमेदवारी देताना पक्ष नेतृत्वाने घातलेले घोळ यामुळे मतदारांमध्ये असलेला रोष काँग्रेसच्या नेत्यांना मतदान यंत्रापर्यंत आणता येईल काय, याविषयी शंका निर्माण करण्यात भाजप-सेनेला यश आले आहे. काँग्रेसपेक्षा राष्ट्रवादी लढवत असणाऱ्या लोकसभा मतदारसंघात चुरस असेल, असे चित्र मराठवाडय़ात दिसून येत आहे.

औरंगाबाद आणि जालना या दोन मतदारसंघांत काँग्रेसने दिलेले उमेदवार कमकुवत आहेत, अशी टीका पक्षातील काही नेत्यांनी केली. औरंगाबादचे माजी खासदार रामकृष्ण बाबा पाटील यांनी उमेदवारीवर प्रश्नचिन्ह निर्माण केले. काँग्रेसविरोधात बंड करणाऱ्या आमदार सत्तार यांच्या शक्तिप्रदर्शनाला हजेरी लावली. त्यामुळे पक्षातील फूट दिसून आली. आमदार सुभाष झांबड पुन्हा नव्या शक्तीने एकवटण्याचा प्रयत्न करत आहेत. विशेषत मुस्लीम आणि दलित मतांचा ओढा काँग्रेसकडे टिकवून ठेवण्यात त्यांना यश मिळते का यावर गणिते अवलंबून असतील. दुसरीकडे एमआयएमकडूनही उमेदवारी जाहीर झालेले आमदार इम्तियाज जलील गुरुवारी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. पाचव्या वेळेस निवडणुकीच्या रिंगणात उभे असणाऱ्या खासदार खैरे यांच्याविषयी नाराजी असली तरी ती मतांमध्ये परिवर्तित करता येईल का, याबाबत ठामपणे सांगता येत नाही.

जालन्यातही काँग्रेसचा गोंधळ

कमकुवत उमेदवारीची चर्चा जशी औरंगाबादमध्ये होते आहे तशीच ती जालना मतदारसंघातही आहे. माजी आमदार कल्याण काळे, आमदार अब्दुल सत्तार यांनी उमेदवारीला नकार दिला. खोतकर यांचे बंड शांत झाले आणि गेले काही दिवस तणावात असणारे भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी सुटकेचा निश्वास सोडला. या मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार विलास औताडे यांनी शक्तिप्रदर्शन न करताच उमेदवारी अर्जही भरला. एकूणच काँग्रेसमध्ये अवसान गळाल्यासारखे वातावरण आहे. अशोक चव्हाण यांच्या मतदारसंघात कार्यकर्त्यांची फळी असल्यामुळे तेथे भाजपच्या उमेदवाराला निवडून आणणे हे आव्हान असणार आहे. प्रताप पाटील चिखलीकर यांचा लोहा संघात संपर्क असला तरी मतदारसंघातून त्यांना पाठिंबा देणारे कोण आणि सर्व विधानसभा मतदारसंघात कार्यकर्त्यांची एकसंध मानसिकता घडवता येऊ शकते काय, यावर नांदेडचे गणित अवलंबून असणार आहे.

परभणी, उस्मानाबादमध्ये चुरस

अशी चुरस परभणी आणि उस्मानाबाद या दोन मतदारसंघांत आहे. हे दोन्ही मतदारसंघ राष्ट्रवादी लढवत आहे. राणाजगजितसिंह पाटील आणि राजेश विटेकर हे दोन उमेदवार अधिक तगडे आहेत, असा दावा राष्ट्रवादीचे नेते करतात. ओम राजेनिंबाळकर आणि बंडू जाधव या दोघांना पक्षांतर्गत होणारा विरोध मोडून काढून राष्ट्रवादीच्या उमेदवारांवर मात करण्यासाठी कष्ट घ्यावे लागणार आहेत. बीड मधील लढतही चुरशीची होईल, असा राष्ट्रवादीचा दावा आहे. बजरंग सोनवणे यांना राष्ट्रवादीने उमेदवारी दिल्यानंतर एका जिल्हा परिषद गटातील व्यक्तीची केलेली निवड चुकीची आहे, अशी भावना बीड वगळता अन्य जिल्ह्य़ांमध्ये होती. तरीही ही लढत चुरशीची असल्याचे बीडमधील जाणकार सांगतात. या मतदारसंघात सर्वाधिक ३६ उमेदवार रिंगणात आहेत हे विशेष. मतांची फाटाफूट व्हावी. विशेषत दलित- मुस्लीम मतदान विखुरले जावे. किंवा एक गठ्ठा झाले तर ते काँग्रेस किंवा राष्ट्रवादीच्या पारडय़ात जाऊ नये असे प्रयत्न जाणीवपूर्वक केले जात आहेत. एमआयएम किंवा वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना किती मते मिळतात यावर विजयाचे सूत्र मांडले जात आहे. मतदानाचा टक्का वाढला तर लाभ कोणाला याचीही गणिते घातली जात आहेत. उमेदवार निवडीपासून ते प्रचाराच्या पहिल्या टप्प्यात विस्कळीत काँग्रेसभोवती भाजप-सेनेकडून अधिक गुंता निर्माण केला जाण्याची शक्यता आहे.

लातूरमध्ये चुरस?

लातूर या अनुसुचित जातीसाठी राखीव असणाऱ्या मतदारसंघात भाजप आणि काँग्रेसमध्ये चुरशीची लढत होईल, असे मानले जात होते. मात्र, अद्याप काँग्रेसकडून ज्या आक्रमकपणे प्रचार यंत्रणा उभी करण्याची गरज होती ती तशी दिसत नाही. ना देवेंद्र ना नरेंद्र आता फक्त मच्छिंद्र अशा घोषणा दिल्या जात असल्या तरी भाजप सरकारने राबविलेल्या योजनांवर ज्या प्रमाणात प्रहार करण्याची गरज होती ती दिसून येत नसल्याचे काँग्रेसचे काही ज्येष्ठ नेतेही सांगतात.

जालन्यात बंड शांत

खोतकर यांचे बंड शांत झाले आणि गेले काही दिवस तणावात असणारे भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी सुटकेचा निश्वास सोडला. या मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार विलास औताडे यांनी शक्तिप्रदर्शन न करताच उमेदवारी अर्जही भरला. एकूणच काँग्रेसमध्ये अवसान गळाल्यासारखे वातावरण आहे.

हिंगोलीत चुरस

हिंगोली मतदारसंघातून राजीव सातव यांनी निवडणूक लढविण्यास नकार दिल्यानंतर सुभाष वानखेडे यांना उमेदवारी देण्यात आली. मात्र त्यांना काँग्रेस कार्यकर्त्यांशी नव्याने जोडून घेणे गरजेचे असणार आहे.

नांदेडमध्ये भाजपपुढे आव्हान

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या  नांदेड मतदारसंघात कार्यकर्त्यांची फळी असल्यामुळे तेथे भाजपच्या उमेदवाराला निवडून आणणे हे आव्हान असणार आहे.

First Published on April 3, 2019 12:53 am

Web Title: shiv sena ncp contestants in marathwada
Just Now!
X