मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सभांमध्ये ‘लाव रे तो व्हिडिओ’ म्हणत भाजपाची पोलखोल केली असतानाच आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी देखील नाशिकमधील सभेत राहुल गांधी यांच्या भाषणाची क्लिप दाखवत काँग्रेसवर टीका केली. राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासंदर्भात केलेल्या विधानांचा या क्लिपमध्ये समावेश होता.  स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान करणाऱ्यांना राहुल गांधींसोबत तुम्ही आघाडी केली, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी शरद पवारांवर केली.

उद्धव ठाकरे यांनी बुधवारी नाशिकमध्ये महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांच्यासाठी प्रचारसभा घेतली. यासभेत उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेसवर टीकेची झोड उठवली.  राज ठाकरे यांच्या सभा चर्चेचा विषय ठरत आहे. सभांमध्ये व्हिडिओ मोठ्या पडद्यावर दाखवायला सांगताना राज ठाकरे कार्यकर्त्यांना ‘लाव रे तो व्हिडिओ’ म्हणताना दिसतात. बुधवारी नाशिकमधील सभेत उद्धव ठाकरेंनेही एक व्हिडिओ सभेत दाखवला. “मी लाव रे तो व्हिडिओ म्हणत नाही. लावा रे ती क्लिप” असे सांगत उद्धव ठाकरे यांनी राहुल गांधी यांच्या भाषणाची एक क्लिप दाखवली.

जवाहरलाल नेहरु आणि महात्मा गांधी यांनी स्वातंत्र्यलढ्यात यातना भोगल्या. पण स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी इंग्रजांसमोर नमते घेतल्याचे  राहुल गांधी यांनी या भाषणात म्हटले होते. यावरुन उद्धव ठाकरे यांनी राहुल गांधी आणि शरद पवार यांचा समाचार घेतला. स्वातंत्र्यलढ्यात यातना भोगणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा आम्ही आदर करतो. पण स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासारखे वीर जन्माला आले नसते तर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हे सत्तेचे स्वप्न पाहू शकले नसते. पंडित जवहारलाल नेहरु यांनी सावरकांइतक्या हालअपेष्टा तुरुंगात भोगल्या असतील तर नेहरुंनाही वीर जवाहरलाल नेहरु असे म्हणायला मी तयार असल्याचेही उद्धव ठाकरेंनी म्हटले आहे.

राहुल गांधी यांनी देशद्रोहाचा कलम रद्द करण्याचे आश्वासन दिले आहे. मग देशावर राज्य कोण करणार, उद्या दाऊद इब्राहिमही भारतात येईल, बिनधास्त फिरेल कारण त्याच्यावर देशद्रोहाचा खटलाच चालणार नाही, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.