|| जयेश सामंत

शिवसेना-भाजपची युती झाल्याने सुरुवातीला सोपी वाटणारी ठाणे लोकसभा मतदारसंघातील लढत आता अटीतटीची ठरू लागली आहे. ठाणे शहरातील शिवसेनेचे मजबूत संघटन बळ ही खासदार राजन विचारे यांच्यासाठी जमेची बाजू मानली जात असली तरी निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाने गल्लोगल्ली मते मागण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या ठाण्यातील सभेतही ही गोष्ट प्रकर्षांने दिसली. यावरून शिवसेनेसाठी ही निवडणूक आव्हानात्मक असल्याचे लक्षात येते.

राष्ट्रवादीने माजी खासदार आनंद परांजपे यांना उमेदवारी दिली आहे. गणेश नाईक यांनी येथून लढावे, असा पक्षाध्यक्ष शरद पवार यांचा आग्रह होता. परंतु त्यांनी नकार दिल्याने परांजपे यांनी हे आव्हान स्वीकारले. राष्ट्रवादीतून कुणीही निवडणूक लढविण्यास तयार नसल्याचे चित्र रंगवले गेल्याने शिवसेना नेते निर्धास्त होते. मात्र राष्ट्रवादीने या ठिकाणी सुरुवातीपासूनच आक्रमक प्रचार करत शिवसेनेला भांबावून सोडले आहे. परांजपे उच्चशिक्षित असून नेमक्या याच मुद्दय़ावरून राष्ट्रवादीने विचारे यांची कोंडी करण्यास सुरुवात केली आहे. खासदार म्हणून विचारे यांच्या कामांविषयी प्रश्न उपस्थित करत शहरातील प्रश्नांवर राष्ट्रवादीने आक्रमक प्रचार सुरू केला आहे. ठाणे महापालिकेत काही वर्षांपूर्वी झालेला नंदलाल गैरव्यवहाराचा मुद्दाही प्रचारात असल्याने उत्तरे देताना शिवसेना नेत्यांची दमछाक होत आहे. विचारे यांच्या कामगिरीविषयी खुद्द शिवसैनिकांच्या मनातही बरेच प्रश्न आहेत. प्रचार करताना पुरेशी रसदही उपलब्ध होत नसल्याने ठाणे, नवी मुंबई, मीरा-भाइर्ंदर भागातील शिवसैनिक कमालीचे नाराज आहेत. तरीही ठाण्यातील शिवसेना-भाजपची परंपरागत मते आणि मीरा-भाईंदरमधील जैन, गुजराती, मारवाडी समाज आपल्याला सहज तारून नेईल, असा विश्वास शिवसेनेला आहे.

राष्ट्रवादीच्या नेत्यांनी प्रचारात आघाडी घेतली असली तरी अपुरे संघटन बळ ही परांजपे यांची कमकुवत बाजू आहे. नवी मुंबईत गणेश नाईक प्रचारात उतरले असले तरी पक्षाचे ठाण्यातील नेते जितेंद्र आव्हाड राष्ट्रीय प्रचारकाच्या भूमिकेतून बाहेर आलेले नाहीत. मीरा-भाईंदर शहरातही राष्ट्रवादी कमकुवत झाल्याने तेथे काँग्रेसचे माजी आमदार मुज्जफ्फर हुसेन यांच्या मदतीशिवाय परांजपे यांना पर्याय नाही. ही निवडणूक उमेदवारांची तुलना करून लढली जावी यासाठी परांजपे यांनी वातावरणनिर्मिर्तीचा प्रयत्न केला असला तरी काँग्रेस, राष्ट्रवादीची  तोळामासा अवस्था पाहता त्यांना कितपत यश येईल याविषयी साशंकता आहे.