अनिकेत साठे

भाजप आमदारांच्या मतदारसंघात शिवसेनेला अधिक आघाडी

लोकसभा निवडणुकीच्या निकालाच्या आधारे आगामी विधानसभेतील समीकरणांची राजकीय पक्षांना नव्याने जुळवाजुळव होणार आहे. विधानसभा मतदारसंघनिहाय मतांच्या आकडेवारीने सिन्नरमध्ये शिवसेना तर इगतपुरीत काँग्रेससमोर कडवे आव्हान उभे ठाकण्याची चिन्हे आहेत. नाशिक लोकसभेत हेमंत गोडसेंना भाजपच्या ताब्यात असणाऱ्या नाशिक पश्चिम मतदारसंघात सर्वाधिक मते मिळाली. त्या खालोखाल नाशिक पूर्व आणि नाशिक मध्य या भाजपच्या ताब्यातील अन् नंतर शिवसेनेचे आमदार असलेल्या देवळालीत मते मिळाली. महायुतीच्या विजयात शिवसेनेच्या तुलनेत भाजपच्या ताब्यातील मतदारसंघांत सरस कामगिरी झाल्याचे अधोरेखीत झाले आहे.

नाशिक पश्चिम

नाशिक लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या हेमंत गोडसेंना सर्वाधिक म्हणजे तब्बल एक लाख ४४ हजार ४२९ मते नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघात मिळाली. या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व भाजपच्या आमदार सीमा हिरे करतात. औद्योगिक वसाहती सामावणाऱ्या आणि कामगार वसाहतींचा अंतर्भाव असणाऱ्या या मतदारसंघात ‘कसमादे’ घटक प्रभावी ठरतो. गोडसेंच्या प्रचारात भाजप आमदारांनी अक्षरश: स्वत:ला झोकून दिले होते. त्याचे दृश्य परिणाम निकालात उमटले. मनसे निष्प्रभ ठरली. या ठिकाणी काँग्रेस आघाडीच्या समीर भुजबळांना अवघी ४० हजार ३२१ मते मिळाली. म्हणजे प्रतिस्पर्धी उमेदवाराच्या साडेतीन पट अधिक मते महायुतीने खेचली. वंचित बहुजन आघाडीच्या पवन पवारांना २० हजार ७८४, तर भाजप बंडखोर अ‍ॅड. माणिक कोकाटेंना अवघी सहा हजार ७१९ मते मिळाली. भाजपने या मतदारसंघावरील आपली पकड अधिक मजबूत केल्याचे निकालात दिसत आहे.

देवळाली

शिवसेनेच्या ताब्यातील देवळाली विधानसभा मतदारसंघ गोडसेंना आघाडी मिळवून देण्यात चौथ्या क्रमांकावर राहिला. खरेतर गोडसेंचे वास्तव्य असणारा हा परिसर. शिवसेनेचा बालेकिल्ला. आमदार योगेश घोलप त्याचे प्रतिनिधित्व करतात. प्रदीर्घ काळापासून हा मतदारसंघ सेनेच्या ताब्यात आहे. पण, भाजपच्या ताब्यातील मतदारसंघाच्या तुलनेत तो मते मिळवून देण्यात मागे पडला. या मतदारसंघात गोडसेंना ८० हजार ६८८ मते मिळाली. काँग्रेस आघाडीच्या भुजबळांना ३८ हजार ७५५, वंचित बहुजन आघाडीला २४ हजार ४५९ आणि कोकाटेंना १० हजार ९६ मते मिळाली. विरोधकांना मिळालेल्या एकूण मतांचा विचार करता महायुतीच्या मतांपेक्षा ती जास्त आहेत. विधानसभा निवडणुकीत ही बाब शिवसेनेला विचार करायला लावणारी, तर विरोधकांना बळ देणारी ठरणार आहे.

नाशिक पूर्व

लोकसभा निवडणुकीत महायुतीला लाखभराहून अधिकचा टप्पा ओलांडून देणारा दुसरा मतदारसंघ म्हणजे नाशिक पूर्व. भाजपचे शहराध्यक्ष बाळासाहेब सानप त्याचे प्रतिनिधित्व करतात. मोदींना पंतप्रधान करण्याच्या इष्र्येने भाजपचे लोकप्रतिनिधी, पदाधिकाऱ्यांनी काम केल्यामुळे या मतदारसंघातही गोडसेंना एक लाख १७ हजार ७२९ मते मिळाली. अर्थात काही ठिकाणी शिवसेनेची ताकद आहे. त्याची जोड मिळाल्याने गोडसेंचे मताधिक्य वाढले. या ठिकाणी भुजबळांना ४० हजार ८५९, वंचित बहुजन आघाडीला २४ हजार ७७६ तर भाजप बंडखोर कोकाटेंना सहा हजार ६६६ मते मिळाली. विधानसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून भाजपने या मतदारसंघावर आपला वरचष्मा कायम राखला आहे.

नाशिक मध्य

नावाप्रमाणे शहराचा मध्यवर्ती भाग सामावणाऱ्या नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघाने गोडसेंना आघाडी मिळवून देण्यात कोणतीही कसर सोडली नाही. या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व भाजप आमदार प्रा. देवयानी फरांदे करतात. लोकसभा निवडणुकीकडे भाजपने विधानसभेची रंगीत तालीम म्हणून पाहिले. त्यादृष्टीने प्रचाराची आखणी करत नेत्यांनी धुरा सांभाळली. मतदारसंघात अल्पसंख्यांकांची संख्या मोठी आहे. येथे गोडसेंना ९४ हजार ४२९ मते मिळाली. राष्ट्रवादीच्या भुजबळांना ५६ हजार ४५९, वंचित आघाडीच्या पवारांना १५ हजार ४०५ तर भाजप बंडखोर कोकाटेंना ५९६४ मते मिळवली. भाजप आणि राष्ट्रवादीला मिळालेल्या मतांमध्ये ३७ हजारांहून अधिकचा फरक आहे.

इगतपुरी

नाशिक लोकसभा निवडणुकीत महायुती आणि काँग्रेस आघाडीत अटीतटीची लढत इगतपुरी-त्र्यंबकेश्वर विधानसभा मतदारसंघात झाल्याचे दिसून येते. या एकमेव मतदारसंघात गोडसे आणि भुजबळ यांच्या मतांमध्ये केवळ पाच ते सहा हजाराचा फरक आहे. काँग्रेसच्या आमदार निर्मला गावित यांच्या मतदारसंघात गोडसेंना ६८ हजार ९७० मते मिळाली. भुजबळ यांना ६३ हजार ५१८, वंचित बहुजन आघाडीला १५ हजार ३१७ तर अ‍ॅड. कोकाटेंना १३ हजार ६७० मते मिळाली. आघाडीच्या उमेदवाराला दुसऱ्या क्रमांकावर जावे लागले. काँग्रेससाठी ही धोक्याची घंटा आहे. विधानसभा निवडणुकीत त्यांच्यासमोर विरोधकांकडून कडवे आव्हान निर्माण केले जाऊ शकते.

सिन्नर

लोकसभा निवडणुकीत तब्बल दोन लाख ९२ हजारहून अधिक मताधिक्याने विजय मिळवणाऱ्या हेमंत गोडसेंना सिन्नर विधानसभा मतदारसंघात दुसऱ्या क्रमांकावर रहावे लागले. विशेष म्हणजे, शिवसेनेचे आमदार राजाभाऊ वाजे या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. भाजपचे बंडखोर अ‍ॅड. माणिक कोकाटे हे या मतदारसंघातील माजी आमदार. त्यांनी ९१ हजार ११४ मते घेऊन पहिले स्थान राखले. गोडसेंना ५६ हजार ६७६ मते मिळाली. तृतीयस्थानी राहिलेल्या भुजबळांना ३० हजार ९४२ मते मिळाली. वंचित बहुजन आघाडीला नऊ हजार ९५ मते मिळाली. या मतदार संघात अपक्ष उमेदवाराने महायुतीला मागे टाकले. यामुळे विधानसभा निवडणुकीत विरोधकांकडून कडवे आव्हान निर्माण करण्यासाठी नव्याने मोर्चेबांधणी होऊ शकते.