09 August 2020

News Flash

विरोधकांनी आत्मचिंतनासाठी आता हिमालयात जावं-शिवसेना

पंतप्रधान नरेंद्र मोदींची खिल्ली उडवलीत आता तुमच्यावरच हिमालयात जाण्याची वेळ जनतेने आणली आहे असे शिवसेनेने म्हटले आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लोकसभा निवडणुकीत अभूतपूर्व यश मिळालं. मोदी लाट वगैरे काहीही नाही असं म्हणणाऱ्या सगळ्यांचेच अंदाज चुकवत पुन्हा एकदा मोदी पंतप्रधान होणार आहेत. भाजपाने ३०० पेक्षा जास्त जागांची बाजी मारत विरोधकांचा सुपडा साफ केला. तर एनडीएने साडेतीनशेपेक्षा जास्त जागा मिळवल्या. अशात आता विरोधकांनी आत्मचिंतन केले पाहिजे असा सल्ला शिवसेनेने देशातल्या सगळ्या विरोधकांना दिला आहे. सामनच्या अग्रलेखातून शिवसेनेने विरोधकांवर शरसंधान केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी एक दिवसासाठी केदारनाथ येथे गेले तेव्हा त्यांची खिल्ली विरोधकांनी उडवली आता विरोधकांना अंगावर राख फासून हिमालयात जाण्याची वेळ आली आहे असाही खोचक टोला शिवसेनेने लगावला आहे.

नेमके काय म्हटले आहे अग्रलेखात?
नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होत आहेत. तेही प्रचंड बहुमताने आणि लोकप्रियतेच्या पर्वतप्राय लाटेवर आरूढ होऊन ते पंतप्रधान होत आहेत. हीच आज राष्ट्राची गरज होती. जनता संकटांशी सामना नेहमीच करीत असते. गेल्या सहा महिन्यांपासून कश्मीरच्या सीमांवर अशांतता आहे हे खरेच, पण बालाकोट येथे मोदींनी हवाई हल्ला घडवून आणला. युनोच्या सुरक्षा परिषदेत सगळी जुळवाजुळव करून मसूद अजहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करायला लावून दहशतवादावर मोठाच विजय मिळवला. त्यामुळे पाकिस्तानच्या गळ्याभोवती आपोआपच फास आवळला गेला.

सत्तेवर येण्यासाठी जशा लष्करी उलथापालथी होतात, रक्तपात आणि हिंसाचार केला जातो तसे काहीही न घडता लोकशाही मार्गानेच मोदी सत्तेवर आले आहेत. मोदी यांनी त्यांच्या विजयाचे श्रेय देशाच्या जनतेला दिले. हा हिंदुस्थानचा विजय असल्याचे सांगितले. झाड फळा-फुलांनी बहरते तेव्हा त्याच्या फांद्या वाकतात. हीच नम्रता विजयानंतर मोदी यांच्यात दिसते, पण पंतप्रधान म्हणून यापुढे मोदी यांनी अधिक कठोर होणे गरजेचे आहे. देशातल्या विरोधी पक्षाला त्यामुळे घाबरून जाण्याचे कारण नाही. विरोधकांनीही त्यांचे काम चालूच ठेवले पाहिजे. लोकशाही प्रक्रियेत ते गरजेचे आहे. विरोधकांनी किमान सभ्यता व विनम्रतेचे दर्शन घडवले तर देशात सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल. मुळात जे स्वतःला विरोधी पक्ष समजतात त्यांचा आवाज संसदेत व बाहेर इतका क्षीण झाला आहे की, पुढील वर्षभर आत्मचिंतनासाठी त्यांनी चारधाम यात्रेस निघून जायला हवे.

मनःशांतीसाठी हिमालयात जाणे हे आरोग्याच्या दृष्टीने बरे आहे. मोदी हे केदारनाथला एक दिवसासाठी गेले व विरोधकांनी त्यांना टीकेचे लक्ष्य केले; पण मोदींना ईश्वराचे आशीर्वाद लाभले व आता हिमालयात राख फासून जाण्याची वेळ विरोधकांवर आली आहे. आपल्यावर ही स्थिती का आली, जनतेने आपले मुद्दे नाकारत आपल्याला पराभवाचे गुद्दे का लगावले, आपली बोलती बंद का केली अशा अनेक गोष्टींचा विचार आता विरोधकांना करावा लागेल. त्यासाठी भरपूर वेळ जनतेनेच त्यांना दिला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 25, 2019 7:12 am

Web Title: shivsena mahagathbandhan results loksabha elections saamana editorial himalaya congress
Next Stories
1 मंत्रिपदांवरून चर्चेला जोर!
2 आमदार जयंत पाटील यांच्यावर गुन्हा दाखल
3 सुशीलकुमारांची राजकीय सद्दी अखेर संपली..!
Just Now!
X