महाराष्ट्रात सर्व ठिकाणी भगवा हा एकच रंग दिसत असून यंदाच्या निवडणुकीत महायुतीच्या सर्व ४८ जागा निवडून येतील असा विश्वास युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला. शिरुर लोकसभा मतदार संघाचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारार्थ युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे सभेला उपस्थित होते.

त्यावेळी आदित्य ठाकरे बोलत होते. यावेळी शिवसेनेचे मंत्री विजय शिवतारे, आमदार नीलम गोऱ्हे, आमदार योगेश टिळेकर, माजी आमदार महादेव बाबर, नगरसेवक नाना भानगिरे तसेच आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी आदित्य ठाकरे म्हणाले की, केंद्रात आणि राज्यात महायुतीच्या सरकारने मोठ्या प्रमाणावर विकास कामे केली आहेत. तर १५ वर्ष काँग्रेस आणि भ्रष्टवादीच्या सरकारने राज्याचे काय करून ठेवले. शेतकरी, सर्व सामान्य नागरिकाला उद्ध्वस्त करण्याचे काम केले आहे अशा शब्दात काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यपद्धतीवर त्यांनी टीका केली.

ते पुढे म्हणाले की, राहुल गांधी म्हणतात आम्ही गरिबी हटवणार असा नारा दिला आहे. असाच नारा त्यांच्या आजीने देखील काही वर्षापुर्वी गरिबीचा नारा दिला होता. पण सर्व सामन्याची गरिबी हटली नाही. तर स्वतःची गरिबी हटविण्याचे काम केले आहे. अशा शब्दात राहुल गांधीना त्यांनी लक्ष केले. तसेच ते पुढे म्हणाले की, ज्या व्यक्तीला महापालिका, राज्य सरकार आणि केंद्र सरकारची कामे माहिती नाही अशा अभिनेत्याला दिल्लीत पाठवून नवीन सिरीयल काढणार का असा सवाल करीत अशा भगव्याशी फितुरी करणार्‍या व्यक्तीला तुम्ही निवडून देणार का? अशा शब्दात अमोल कोल्हे यांच्यावर त्यांनी निशाणा साधला.