लोकसभा निवडणुकीचा निकाल काय लागणार याची उत्सुकता जितकी आपल्या देशात आहे तितकीच ती शेजारच्या पाकिस्तानातही आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा पंतप्रधान व्हावेत की नाही यासंबंधी पाकिस्तानमधली प्रसारमाध्यमांवर चर्चा रंगल्या आहेत. भारत आणि पाकिस्तानमध्ये अद्यापही तणाव असून निवडणुकीच्या प्रचारात सर्जिकल स्ट्राइकचा मुद्दा चांगलाच रंगला होता.

भारतीय हवाई दलाने पाकिस्तानात घुसून केलेल्या सर्जिकल स्ट्राइकच्या मुद्यावरुन पाकिस्तानमधील नागरिकांमध्ये चांगलीच चर्चा सुरु आहे. ‘नरेंद्र मोदी पुन्हा सत्तेत नाही आले पाहिजेत. त्यांनी पाकिस्तानात घुसून सर्जिकल स्ट्राइक केला’, असं मत लाहोरचे नगरिक शाही अलम यांनी पाकिस्तानी टीव्ही चॅनेलशी बोलताना व्यक्त केलं आहे.

अन्य एक नागरिक एजाज यांनी म्हटलं आहे की, ‘नरेंद्र मोदी बहुमताने पुन्हा सत्तेत येतील की नाही याबाबत शंका आहे. त्यांना बहुमत मिळणार नाही आणि हे पाकिस्तानच्या दृष्टीने चांगलं आहे’. विशेष म्हणजे, पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी काही दिवसापुर्वी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा सत्ते आले तर शांततेवर चर्चा करणं सोपं जाईल असं म्हटलं होतं.

लंडनमध्ये राहत असलेले पाकिस्तानी व्यवसायिक रियाज यांनी टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना सांगितलं आहे की, ‘पाकिस्तानात राहत असलेल्या लोकांचं आणि विदेशात राहत असणाऱ्या पाकिस्तानी नागरिकांचं मत पूर्णपणे वेगळं आहे. आम्हाला वाटतं नरेंद्र मोदी पुन्हा सत्तेत आले पाहिजेत. पाकिस्तानी जमिनीवर असणाऱ्या दहशतवादी संघटनांविरोधात कारवाई होईल आणि यामुळे दहशतवाद संपवण्यासाठी पाकिस्तानवर दबाव येईल’.