शरद पवार यांचे प्रतिपादन

शेती, सिंचन, दुष्काळ, बेरोजगारी यावर न बोलता पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशासाठी त्याग करणाऱ्या गांधी कुटुंबावरच टीकेची झोड उठवत आहेत. तरी, देशाच्या स्वातंत्र्यापासून बलिदान देणाऱ्या गांधी कुटुंबावर कायम टीकात्मक बोलणाऱ्यांना त्यांची जागा मतदानातून दाखवा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी केले.

संजय शिंदे यांच्या प्रचारार्थ दहिवडी (ता. माण) व फलटण येथे आयोजित सभेत ते बोलत होते. विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर या वेळी उपस्थित होते.

पवार म्हणाले, की नरेंद्र मोदींच्या नुसत्या वल्गनाच असून, त्यांच्या सरकारच्या काळात ना उद्योगांना चालना मिळाली ना नव्याने नोकऱ्या निर्माण झाल्या.

राष्ट्राला अग्रेसर ठेवायचे असेल, तर प्राधान्याने शेतीचा विचार होण्याची नितांत गरज आहे. या पाश्र्वभूमीवर पंतप्रधान मोदी अकलूज येथील सभेत शेतकऱ्यांना दिलासादायक बोलतील असे वाटले. पण, शेतीच्या प्रश्नांवर ते बोललेच नाहीत. शेतकरी कर्जमुक्तीबाबत सरकारला सहनुभूती नाही.

शेतीची बिकट अवस्था असून, गंभीर दुष्काळ असतानाही शेतकरी आणि दुष्काळग्रस्तांना ते विचारतच नसल्याची खंत पवार यांनी व्यक्त केली.

रामराजे म्हणाले, की माढय़ातील विरोधी उमेदवाराचा आमचा काहीही संबंध नसून, केवळ स्वार्थी वृत्तीने ते काम करतात. तरी या निवडणुकीत त्यांची अनामत रक्कमही घालवा.