केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी बुधवारी मध्य प्रदेशमध्ये निवडणुक प्रचारसभा घेतली. या सभेमध्ये इराणी यांनी राज्यात सत्तेत असणाऱ्या काँग्रेसच्या कारभारावर टिका केली. आपल्या भाषणादरम्यान त्यांनी उपस्थित शेतकऱ्यांना ‘सरकारने तुमचे कर्ज माफ केले का?’ असा सवाल विचारला. इराणी यांना या प्रश्नाचे उत्तर ‘नाही’ असे अपेक्षित असतानाच उपस्थित शेतकऱ्यांनी मात्र ‘हो’ असे उत्तर दिले. या अनपेक्षित उत्तरामुळे इराणी यांना पुढे काय बोलावे हे क्षणभर समजलेच नाही.

अशोनगर येथील एका सभेला संबोधित करताना स्मृती इराणी यांनी विभानसभा निवडणुकीचा उल्लेख केला. मध्य प्रदेशमधील विधासभा निवडणुकीदरम्यान काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी दिलेल्या आश्वासनांची आठवण इराणी यांनी उपस्थितांना करुन दिली. ‘खरोखरच राहुल गांधी यांनी दिलेले आश्वासन पाळले का? त्यांनी शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले का?’ असे सवाल त्यांनी उपस्थितांना विचारले. यावर सभेला उपस्थित असणाऱ्यांनी इराणी यांना ‘हो आमची कर्ज माफ झाली’ असे उत्तर एका सुरात दिले. या संपूर्ण प्रकाराचा व्हिडिओ मध्य प्रदेश काँग्रेसच्या ट्विटर अकाऊंटवरुन ट्विट करण्यात आला आहे. यामध्ये काँग्रेसने ‘खोटं बोलणाऱ्यांना जनता थेट उत्तर देऊ लागली आहे. आता तरी खोटं बोलणं थांबवा’ असा टोला इराणी यांना लगावला आहे.

इराणी यांनी शेतकऱ्यांना कर्जमाफी झाली का हा प्रश्न विचारल्यानंतर जवळजवळ अर्धा मिनिटे उपस्थितांनी ‘हो.. हो.. कर्ज माफ झाले’ अशी उत्तरे देत गोंधळ केला. त्यामुळे इराणी यांना आपले भाषण थांबवावे लागले. हा व्हिडिओ व्हायरल झाला असून यावरुन भाजपा समर्थक आणि काँग्रेस समर्थकांमध्ये चांगालाच वाद सुरु झाला आहे. मध्य प्रदेशमध्ये काँग्रेस सत्तेत आल्यानंतर लगेचच शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा निर्णय सरकारने घेतला होता. मात्र राहुल गांधी यांनी शेतकऱ्यांना दिलेली आश्वासने पाळली नाहीत अशी टिका मध्य प्रदेश भाजपाने अनेकदा केली आहे. याच वादावरुन काँग्रेसच्या नेते मंगळवारी भाजपाचे नेते आणि माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या घरी कर्जमाफीचे पुरावे घेऊन गेले होते. मध्य प्रदेशमध्ये कर्जमाफीचा फायदा मिळालेल्या २१ लाख शेतकऱ्यांची नावे होती असा दावा काँग्रेसने केला आहे.