अमेठीत मतदान केंद्र ताब्यात घेण्याचा राहुल गांधींचा प्रयत्न असल्याचा आरोप स्मृती इराणी यांनी मतदानादरम्यान सकाळीच केला होता. यावर प्रतिक्रिया देताना काँग्रेस नेते नवज्योतसिंग सिद्धू यांनी त्यांच्यावर टीका केली आहे. स्मृती इराणींनी अद्याप सरपंचपदाचीही निवडणूक जिंकलेली नाही आणि तरीही त्या एखाद्या मोठ्या नेत्याप्रमाणे बुथ कॅप्चरींगचा आरोप करीत थयथयाट करीत आहेत, असे त्यांनी म्हटले आहे. दिल्लीत पत्रकार परिषदेत सिद्धू बोलत होते.

इराणींनी पहिल्यांदा दिल्लीतील चांदणी चौक मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. त्यावेळी त्या दीड लाख मतांनी हारल्या होत्या. त्या एक रडक्या बाई आहेत, लहान मुलाप्रमाणे रडत त्या तक्रारी करीत असतात. पतंप्रधान मोदींसारखीच त्यांची रडीची गोष्ट आहे, अशा शब्दांत सिद्धू यांनी त्यांना टोला लगावला.

सिद्धू म्हणाले, स्मृती इराणींच्या खऱ्याचा दाखला आम्हाला मिळाला आहे. त्यांनी पहिल्यांदा निवडणूक निवडणूक लढवताना बीए पास असल्याचे सांगितले. त्यानंतर दुसऱ्यांदा त्यांनी आपण बारावी पास असल्याचे सांगितले. त्यानंतर यापुढे तिसऱ्यांदा निवडणूक लढवताना त्या केजीमध्ये प्रवेश घेतील याची मला भिती वाटतेय.

एकीकडे काँग्रेसवर चार पिढ्यांचा विश्वास आहे तर दुसरीकडे दीड लाख मतांनी तुम्ही हारलेले असतानाही आरडा-ओरडा कसा काय करता? असेही यावेळी सिद्धू यांनी म्हटले.