काँग्रेस नेते नवज्योत सिंग सिद्धू सतत भाजपावर टीका करत असून यावेळी त्यांनी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्यावर निशाणा साधला आहे. नवज्योत सिंग सिद्धू यांनी यावेळी स्मृती इराणी यांच्या शैक्षणिक पात्रतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत टोला लगावला आहे. नवज्योत सिंग सिद्धू यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, ‘स्मृती इराणी जो २०१४ मध्ये बीएस पास होत्या, २०१९ मधील निवडणुकीत बारावी पास झाल्या आहेत. मला वाटतं २०२४ निवडणुकीच्या आधी केजी (KG) क्लासमध्ये नक्की अॅडमिशन घेतील’.

केंद्रीय मंत्री स्मृती इराणी अमेठीमधून निवडणूक लढवत आहेत. स्मृती इराणी यांनी निवडणूक आयोगाकडे दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात आपण पदवीधर नसल्याची माहिती दिली आहे. पहिल्यांदाच स्मृती इराणी यांनी निवडणूक आयोगाकडे दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात आपण तीन वर्षांचं पदवी शिक्षण घेतलं नसल्याचं स्पष्ट केलं आहे.

केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी २०१४ च्या निवडणुकीच्या वेळी पदवीधर असल्याचे प्रतिज्ञापत्रामध्ये नमूद केले होते, मात्र या वेळी त्यांनी केवळ १२ वी उत्तीर्ण असल्याचे नमूद केले आहे.

इराणी यांनी निवडणूक आयोगाला दिलेल्या प्रतिज्ञापत्रामध्ये केवळ १२ वी उत्तीर्ण असल्याचे म्हटले आहे. त्यांनी १९९१ मध्ये शालान्त परीक्षा आणि १९९३ मध्ये सीनिअर सेकंडरी परीक्षा उत्तीर्ण केल्याचे म्हटले आहे. तर दिल्ली विद्यापीठाच्या स्कूल ऑफ ओपन लर्निगमधून त्यांनी तीन वर्षांच्या पदवी अभ्यासक्रमात बी.कॉमचा भाग-१ पूर्ण केलेला नाही असे त्यांनी प्रतिज्ञापत्रामध्ये म्हटले आहे. लोकसभेच्या गेल्या निवडणुकीच्या वेळी मात्र इराणी यांनी १९९४ मध्ये विद्यापीठातून पदवी घेतल्याचे म्हटले होते.