News Flash

बोलणारा देव मीच आहे; सोलापूरमधील भाजपा उमेदवार जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांचा अजब दावा

जयसिद्धेश्वर महास्वामी यांच्या भाषणाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

संग्रहित छायाचित्र

१५ ते १९ एप्रिल हा सुट्टीचा कालावधी आहे. सुट्टी मिळाल्याचे समाधान मानून कोणी गावाला गेले, सहलीला किंवा देवदर्शनाला गेले तरीसुद्धा तुम्हाला पुण्य मिळणार नाही. देवदर्शनासाठी गेलात तरी देव बोलणार नाही. कारण बोलणारा देव मीच आहे, असे वादग्रस्त विधान भाजपाचे सोलापूरमधील उमेदवार  डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांनी केले आहे.

भाजपाने सोलापूरमध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांच्याविरोधात अक्कलकोट तालुक्यातील गौडगाव वीरशैव मठाचे मठाधिपती डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी शिवाचार्य यांना उमेदवारी दिली आहे. जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांनी शनिवारी भवानी पेठेतील अथर्व गार्डन येथे प्रचारसभा घेतली. या प्रचारसभेतील जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांचे भाषण वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे.

“येत्या १५ एप्रिल ते १९ एप्रिलपर्यंत कोणीही सहलीला किंवा देवदर्शनासाठी जाऊ नये. देवदर्शनासाठी गेलात तरी तुम्हाला पुण्य मिळणार नाही.  तुम्हाला समाधान मिळणार नाही. तुळजापूर किंवा पंढरपूरला गेला तरी देव भेटणारही नाही आणि बोलणारही नाही. कारण बोलणारा देव मीच आहे”, असे जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांनी म्हटले आहे.  मतदान हे पवित्र काम आहे. मताचे दान टाकून सर्वांनी मतदानाचा हक्क बजावला पाहिजे, असे  आवाहनही त्यांनी केले. १८ एप्रिल रोजी सोलापूरमध्ये लोकसभा निवडणुकीसाठी मतदान होणार असून या पार्श्वभूमीवर त्यांनी विधान केले आहे. जयसिद्धेश्वर महास्वामी यांच्या भाषणाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

दरम्यान, जयसिद्धेश्वर महास्वामी यांच्या विधानाचा विपर्यास केल्याचा दावा त्यांच्या समर्थकांकडून केला जात आहे.  भाषणाचा व्हिडिओ एडिट करुन तो जाणूनबुजून अशा पद्धतीने व्हायरल करण्यात आला, असे त्यांच्या समर्थकांचे म्हणणे आहे.

कोण आहेत जयसिद्धेश्वर महास्वामीजी ?
वीरशैव लिंगायत समाजात प्रभाव असलेले डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामीजी शिवाचार्य हे सनातनी विचारांचे असून त्यांच्यावर भाजपचा अर्थात हिंदुत्ववादी विचारसरणीचा प्रभाव आहे. जानेवारी महिन्यात सोलापुरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा झाली, त्या वेळी हे महास्वामीजी शिवाचार्य केवळ हजर राहिले नव्हते, तर त्यांनी सभास्थळी स्वत:च्या हाताने पंतप्रधान नरेंद्र मोदी व सोलापूरचे पालकमंत्री विजय देशमुख यांची प्रतिमा असलेले हातमाग कापड उंच झळकावले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 1, 2019 11:01 am

Web Title: solapur bjp candidate jai siddheshwar mahaswami remark sparks row says i am the god
Next Stories
1 केजरीवालांची राहुल गांधींबरोबर भेट निष्फळ, आघाडीला नकार
2 स्थानिक महिलेशी मैत्री अंगलट, मेजर लितुल गोगोईंना झाली ‘ही’ शिक्षा
3 आज प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख जमा होणार, निवडणुकांआधी मोदींचा मास्टर्सस्ट्रोक
Just Now!
X