सोलापूर जिल्ह्यात दुष्काळात सर्वत्र पाणीटंचाई जाणवत असून याचा परिणाम मतदानावरही दिसून आला. दक्षिण सोलापूर तालुक्यातील कासेगाव येथे ग्रामस्थांना मतदानापेक्षा पाणी महत्त्वाचे होते. मतदान केंद्राबाहेरील गर्दीपेक्षा कासेगावात पाण्यासाठी घागरींची भली मोठी रांग दिसून आली.

सोलापूर लोकसभा मतदार संघात सकाळी मतदानाला सुरूवात झाल्यानंतर मतदानयंत्रांमध्ये बिघाड झाल्याचे प्रकार समोर आले. त्याचा परिणाम मतदानावर होत असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. वाढत्या तापमानामुळे मतदान यंत्रे नादुरूस्त होत असल्याचे सांगितले जाते. मात्र, सकाळी आठ-नऊ वाजता तापमान जास्त नसते, तरी देखील मतदान यंत्रांमध्ये बिघाड होत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. मतदान केंद्रावर मतदारांना ताटकळत थांबावे लागत होते. सकाळी पहिल्या दोन तासांत जेमतेम ७ टक्के मतदान झाले.

सोलापूर शहरात पाच दिवसाआड पाणीपुरवठा होतो. ज्या भागात गुरुवारी पाणीपुरवठा झाला, तेथील मतदारांनी विशेषतः महिला मतदारांनी घरात पाणी भरल्यानंतरच मतदानासाठी घराबाहेर पडणे पसंत केले. तर ग्रामीण भागातही पाण्यासाठी ग्रामस्थांना हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. दक्षिण सोलापूर तालुक्यातील कासेगाव येथे मतदानापेक्षा पाणी महत्त्वाचे होते. पाण्यासाठी घागरींची भली मोठी रांग दिसून आली.

दरम्यान, सोलापूर मतदार संघात काँग्रेसचे सुशीलकुमार शिंदे व भाजपचे डॉ. जयसिध्देश्वर शिवाचार्य यांनी सकाळी मतदानाचा हक्क बजावला. शिंदे यांनी सकाळी नेहरूनगर येथील वसंतराव नाईक प्रशालेच्या मतदान केंद्रात पत्नी उज्ज्वला व कन्या आमदार प्रणिती यांच्यासह मतदान केले. तर डॉ. जयसिध्देश्वर शिवाचार्य यांनी अक्कलकोट तालुक्यात गौडगाव येथे मतदान केले.

सोलापुरात सकाळी पहिल्या दोन तासांपर्यंत अतिशय संथ गतीने मतदान झाले. यात केवळ ५.६५ टक्के (एक लाख ४६१६ मतदान पुरूष ७.१२ टक्के तर महिला फक्त ४.०६ टक्के) मतदान झाले.