काँग्रेसने काल मोठा गाजावाजा करुन जाहीरनाम्याचे प्रकाशन केले. पण या जाहीरनाम्याच्या मुख्यपृष्ठाचे पान काँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी यांना आवडले नसल्याची माहिती आहे. जाहीरनामा प्रकाशनासाठी मंचावर जाण्याआधी सोनिया गांधींनी काँग्रेस नेते राजीव गौडा यांच्याकडे आपली नाराजी बोलून दाखवली असे वृत्त इंडिया टुडेने सूत्रांच्या हवाल्याने दिले आहे.

राजीव गौडा अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या संशोधन समितीचे प्रमुख आहेत. मंचावर जाण्याआधी राजीव गौडा सोनिया गांधींना समजावून सांगण्याचा प्रयत्न करत होते पण सोनिया गांधींना त्यांचे मुद्दे पटले नसल्याचे हावभावावरुन दिसेल असे इंडिया टुडेने आपल्या वृत्तात म्हटले आहे.

काँग्रेस जाहीरनाम्याच्या मुखपृष्ठावर मोठया गर्दीचा फोटो असून राहुल गांधी आणि काँग्रेसचे निवडणूक चिन्हा तळाला दाखवले आहे. मुख्यपृष्ठाची ही डिझाईन सोनियांना आवडली नसल्याचे सूत्रांनी सांगितले. राहुल गांधी आणि निवडणूक चिन्हाचा लहान साईजमधला फोटो सोनिया गांधींना पटलेला नाही.

या जाहीरनामा प्रकाशनाच्यावेळी सोनिया गांधी पत्रकारांच्या कुठल्याही प्रश्नांना सामोऱ्या गेल्या नाहीत. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, पी. चिदंबरम यांनी देखील जाहीरनाम्यावर आपले विचार मांडले. काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्यात अनेक मोठया घोषणा केल्या आहेत. गरीबांच्या खात्यात वर्षाला ७२ हजार कोटी रुपयांसह सहा महिन्यात २२ लाख सरकारी नोकऱ्यांची पदे भरण्यासारख्या मोठया घोषणा राहुल यांनी केल्या आहेत.