निवडणुकीतील रोजगार

यंदाच्या निवडणुकीत सर्व राजकीय पक्षांनी हायटेक प्रचाराला प्राधान्य दिले आहे. राजकीय पक्ष आणि उमेदवारांसाठी सभा, पदयात्रा, गाठीभेटी यांचे चित्रीकरण करण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे, फूलस्क्रीन एलईडी व्हॅन यांचा चमू असतो. बहुतांश उमेदवारांकडून सभा, कोपरा सभा सुरू होण्यासाठी वातावरण निर्मिती केली जाते आणि त्यासाठी पक्षाची किंवा उमेदवाराची क्लिप दाखवण्याचा पद्धत सुरू आहे. अशा हायटेक प्रचारामुळे यंदा चित्रफीत निर्मात्यांना सुगीचे दिवस आले आहेत.

मतदारांचे मोबाइल क्रमांक मिळवून पक्ष आणि उमेदवारांच्या हायटेक समितीने दररोजच्या सभा, मेळावे, ध्वनिमुद्रित केलेला उमेदवारांचा आणि पक्षाच्या स्टार प्रचारकांचा आवाज मोबाइलद्वारे किंवा एलईडी व्हॅनद्वारे मतदारांसमोर सादर करण्यात येत आहे. चित्रफीत तयार करण्यासाठी प्रतिव्यक्ती चार ते पाच हजार रुपये घेतले जात आहेत. तर, तयार केलेल्या चित्रफितीचे संपादन, तसेच ती अधिकाधिक आकर्षक करण्यासाठी एका दिवसाचे सात ते आठ हजार रुपये घेतले जातात.

याबरोबरच सभा, मेळाव्यांसाठी छायाचित्रकारांनाही मोठय़ा प्रमाणावर मागणी आहे. स्टार प्रचारक, प्रसिद्ध व्यक्ती, मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री अशा वलयांकित व्यक्तींच्या सभा प्रचारासाठी आयोजित केल्यास सभास्थानी चार कॅमेरे लावले जातात. त्यामध्ये तीन हॅण्डीकॅम आणि एक जिमी कॅमेरा असतो. एक छायाचित्रकार सभास्थळाच्या व्यासपीठावरील मान्यवरांची छायाचित्रे घेण्यासाठी, दुसरा सभेच्या ठिकाणावरील प्रवेशद्वारात, तिसरा गर्दी, तर चौथा छायाचित्रकार उपस्थित मुख्य अतिथींची छायाचित्रे घेण्यासाठी अशी सर्वसाधारण विभागणी करण्यात येते, अशी माहिती छायाचित्रकार प्रदीप कांबळे यांनी दिली.

याबरोबरच सभास्थानी दोन ते चार मोठय़ा स्क्रीन लावल्या जातात, त्याचे नियंत्रण करण्यासाठी देखील एका व्यक्तीची गरज भासते. यंदा बहुतांशी उमेदवारांनी एलईडी गाडय़ा प्रचारासाठी घेतल्या असून, त्याद्वारे चित्रफिती तयार करून सादर करण्याकडे कल आहे. या चित्रफिती सभा सुरू होण्याआधी देखील उपस्थितांना दाखवण्यात येतात, असेही कांबळे यांनी सांगितले.

मांडव व्यावसायिकांना मागणी जास्त

निवडणुकांच्या काळात पक्ष कार्यालये, उमेदवारांची संपर्क कार्यालये अशा ठिकाणी मांडव टाकण्यात येतो. कडक उन्हाळा असल्यानेही मांडव टाकण्याला मागणी आहे. सभांच्या ठिकाणी व्यासपीठापुरताच मांडव टाकावा लागतो. त्यामध्ये कमानी, बॉक्स गेट यांचा देखील समावेश असतो. सभा महत्त्वाच्या नेत्याची असल्यास बॅरिकेटिंग अधिक करावे लागते. ऐनवेळी मांडव टाकण्यासाठी बोलावणे येत असल्याने वीस जणांचा चमू कायम तयार ठेवावा लागतो. मांडव किती मोठा घालायचा आणि कापड कोणते वापरायचे, त्यावर त्याची किंमत ठरते, असे मांडववाले श्रीकांत अप्पा गवळी यांनी सांगितले.