पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाजवादी पार्टी आणि बहुजन समाज पार्टी या दोन्ही पक्षांवर आज उत्तर प्रदेशातील देवरिया येथील प्रचार सभेत सडकून टीका केली. सपा-बसपामध्ये रोड रोमियोंना हाताळण्याची क्षमता नाही ते दहशतवादाविरोधात कसे लढणार, अशा शब्दांत मोदींनी या दोन्ही पक्षांवर तोफ डागली.


काँग्रेसवर निशाणा साधताना मोदी म्हणाले, मतं कापण्याचं काँग्रेसचं संरक्षण धोरण हे दहशतवादाला आणि नक्षलवादाला प्रोत्साहन देणारं आहे. मयावती आणि अखिलेश यांच्यावर टीका करताना मोदी म्हणाले, मी माझ्या कार्यालयाचा वापर कधीही वैयक्तिक कारणासाठी केला नाही.

बुआ-बबुआ (मायावती-अखिलेश) यांच्या पक्षांनी एकत्र येऊन जितक्या वेळा सत्ता स्थापन केली त्यापेक्षा अधिक काळासाठी मी एका समृद्ध अशा राज्याचा मुख्यमंत्री राहिलो आहे. त्याचबरोबर मी गेल्या पाच वर्षांपासून देशाचा पंतप्रधानही आहे. मात्र, मी माझ्या कार्यालयाचा वापर माझी आणि माझ्या कुटुंबाची गरीबी दूर करण्यासाठी कधीही केला नाही, अशा शब्दांत मोदींनी मायावती आणि अखिलेश यादव यांच्यावर निशाणा साधला. पुढील २०-२२ वर्षात जेव्हा माझे शरीर मला साथ देणार नाही तेव्हाही मी भाड्याचे घरच शोधत असेन, असेही मोदी यावेळी म्हणाले.

विरोधकांवर निशाणा साधताना मोदी म्हणाले, जनतेचा पैसा आणि राष्ट्राची संपत्ती लुटण्यासाठी विरोधकांना केंद्रात आपले सरकार स्थापन करायचे आहे. त्यांना सत्तेत आल्यानंतर पुन्हा स्वतःच्या कुटुंबासाठी आणि परिचयाच्या लोकांसाठी लुटण्याचा परवाना पाहिजे आहे. एकाने यापूर्वी कोळसा घोटाळा केला होता, एकाने टेलिकॉम तर एकाने बांधकामाच्या वीटा आणि सिमेंटही लुटलं होतं.

मी रात्रभर वीजेचे कनेक्शन नसल्याने कोरोसिनच्या दिव्याच्या उजेडात अभ्यास केला आहे. ज्या कुटुंबांकडे शौचालये नाहीत, बँक अकाऊंट नाही, आरोग्य सुविधा नाहीत त्यांच्यासाठी जगणं किती कठीण असंत हे मी अनुभवलं आहे, असेही मोदी यावेळी म्हणाले.