समाजवादी पार्टीने उत्तर पश्चिम मुंबई मतदारसंघातून उमेदवार उभा केल्यामुळे काँग्रेस उमेदवार संजय निरुपम यांचा मार्ग अधिक खडतर बनला आहे. उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघात संजय निरुपम यांची थेट लढत शिवसेना उमेदवार गजानन किर्तिकर यांच्या बरोबर आहे. गजनान किर्तिकर विद्यमान खासदार आहेत. उत्तर प्रदेशातील सैदपूर विधानसभा मतदारसंघातून आमदार असलेल्या सुभाष पासी यांना समाजवादी पार्टीने येथून उमेदवारी दिली आहे.

उत्तर पश्चिम मतदारसंघात उत्तर भारतीय आणि मुस्लिम समाजाची मिळून एकूण सात लाख मते आहे. संजय निरुपम यांची मुख्य मदार या मतांवरच आहे. त्यामुळे यावेळी त्यांनी उत्तर पश्चिम मतदारसंघातून उमेदवारी मागून घेतली आहे. सुभाष पासी यांच्या उमेदवारीमुळे या एकगठ्ठा मतांचे विभाजन होण्याचा धोका आहे.

उत्तर भारतीय मतदारांमध्ये बहुजन समाज पार्टीशी एकनिष्ठ असलेले मतदारही आहेत. ही मते सुद्धा सुभाष पासी यांच्याकडे वळू शकतात. उत्तर प्रदेशात सपा आणि बसपाची आघाडी झाली आहे. मुंबई काँग्रेसमधील एका वरिष्ठ काँग्रेस नेत्याला या मतदारसंघातून निवडणूक लढवायची होती. त्याला संधी मिळाली नाही. तो पासी यांच्या उमेदवारीमागे आहे असे हिंदुस्थान टाइम्सने एका वरिष्ठ काँग्रेस नेत्याच्या हवाल्याने म्हटले आहे. समावादी पार्टीने नांदेड, बीड आणि भिवंडीमध्ये उमेदवार उभे केले आहेत. मुंबईत फक्त या मतदारसंघातून समाजवादी पार्टी निवडणूक लढवत आहे.