जिल्हा निवडणूक कार्यालयाची लवकरच हेल्पलाइन; मुंबईत २,६२२ अपंग मतदार

मुंबई : अपंग मतदारांना मतदान केंद्रापर्यंत पोहोचताना येणाऱ्या अडचणींचा विचार करून त्यांना सहजपणे मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी मुंबई शहर जिल्हा निवडणूक कार्यालय विशेष सुविधा देणार आहे. घरापासून मतदान केंद्रापर्यंत वाहन, व्हीलचेअर आदी सुविधा अपंग मतदारांना उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.

मुंबई शहरात दक्षिण मुंबई व दक्षिण मध्य मुंबई हे दोन लोकसभा मतदारसंघ येतात. या मतदारसंघांत सामान्य मतदारांबरोबरच अपंग मतदारही आहेत. दक्षिण मुंबई व दक्षिण मध्य मुंबईत अंध, मूकबधिर यासह अन्य अपंग मतदारांची एकूण संख्या २ हजार ६६२ एवढी आहे. अंध मतदारांची संख्या ४२० असून मूकबधिरांची संख्या ३२२ आहे. विकलांगत्व असलेले १,९२० मतदार आहेत. सर्वाधिक अपंग मतदार शिवडी, सायन कोळीवाडा, वडाळा विधानसभा मतदारसंघांत आहेत.

काही वेळा अपंग मतदार हे त्यांच्या नातेवाईकांच्या मदतीने मतदान केंद्रापर्यंत पोहोचतात. परंतु काही अपंग मतदारांना केंद्रापर्यंत पोहोचणे शक्य होत नाही. त्यांचे मत वाया जाऊ नये आणि त्यांनाही मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी मुंबई शहर जिल्हा निवडणूक कार्यालयाने विशेष सुविधा देण्याचा निर्णय घेतला आहे. अशा मतदारांना मतदान केंद्रापर्यंत येण्यासाठी वाहन, व्हीलचेअर दिली जाणार आहे.

दोन्ही मतदारसंघांतील ३८९ मतदारांनी नोंदणी करतानाच मतदान केंद्रापर्यंत जाण्यासाठी मदत मागितली आहे. आणखी काही अपंग मतदारांना मदत हवी असल्यास त्यासाठी हेल्पलाइन क्रमांकही उपलब्ध केला जाणार आहे. व्हीलचेअरसाठी काही सामाजिक संस्थांशीही चर्चा झाली असून त्यांनीही मदतीचे आश्वासन दिले आहे, असे मुंबई शहर जिल्हा निवडणूक कार्यालयाकडून सांगण्यात आले. अपंग मतदारांना घर ते मतदान केंद्र वाहन उपलब्ध करून देतानाच मतदान केंद्राच्या ठिकाणीही व्हीलचेअर, कर्मचारी, विशेष प्रसाधनगृहाची सोय केली जाणार आहे.

मुंबई शहरातील अपंग मतदार

मतदारसंघ                     मतदार

धारावी                             २५५

सायन कोळीवाडा             ३२२

वडाळा                             ३०१

माहीम                             २१४

वरळी                              २०९

शिवडी                             ५३१

भायखळा                        १४९

मलबार हिल                    २५८

मुंबादेवी                           २७६

कुलाबा                             १४७