जयेश शिरसाट

मराठी मतांचा फटका बसू नये म्हणून पद्धतशीर प्रचार

यंदाच्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात मराठीचा मुद्दा फारसा चर्चेत नसला तरी, मुंबईतील अमराठी उमेदवारांनी आधीच त्याची धास्ती घेतली आहे. मुंबईतील मराठी मतांचा फटका आपल्याला बसू नये, यासाठी अमराठी उमेदवार पद्धतशीर प्रचार करत आहेत. त्यामध्ये मराठी कलाकारांची मदत घेण्यापासून मराठी भाषा, संस्कृती आपल्यात कशी भिनली आहे, हे दाखवण्यापर्यंतच्या क्लृप्त्या वापरण्यात येत आहेत.

यंदा लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीतच गुढीपाडवा आल्याने त्या दिवशी सर्वच उमेदवारांनी आपला मराठी बाणा दाखवत प्रचार केला. उमेदवारांच्या समवेत अनेक ठिकाणी गुजराती, दाक्षिणात्य किंवा हिंदी भाषिक कार्यकर्तेही यंदा गुढीपाडव्याच्या शोभायात्रांमध्ये सहभागी झालेले दिसून आले. अनेक ठिकाणी उमेदवारांनी पालखी खांद्यावर घेतली, लेझीमच्या ठेक्यावर तालही धरला. हनुमान जयंतीनिमित्त शुक्रवारी आयोजित कार्यक्रमांमध्ये उपस्थित राहून उमेदवारांनी प्रचाराची संधी सोडली नाही.

सण-उत्सवच नव्हे तर आपल्या खाद्यजीवनातही मराठी संस्कृती रुळली असल्याचे दाखवताना काही अमराठी उमेदवारांची मिसळ, पोहे, वडापावचा आस्वाद घेतानाची छायाचित्रे समाजमाध्यमांवरून प्रसारित केली जात आहेत. मराठी वस्त्यांमध्ये फिरताना तोडक्यामोडक्या मराठीत का होईना संवाद साधण्यावर भर दिला जात आहे. एवढेच नव्हे तर,  ‘मी मराठी नसलो तरी आमच्या घरी मराठीतूनच संवाद साधला जातो’, ‘मराठी शेजाऱ्यांमध्ये लहानाचा मोठा झालो’, ‘छत्रपती शिवाजी महाराजांच्या गोष्टी ऐकून भारावून गेलो’, ‘मुंबई हीच माझी कर्मभूमी आहे’ अशी विधाने त्यांच्या प्रचारात हमखास ऐकायला मिळत आहेत.

उत्तर मुंबई, ईशान्य मुंबई मतदारसंघातून महायुतीचे गोपाळ शेट्टी, मनोज कोटक हे उमेदवार आपले ‘मराठीपण’ दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत. या दोन्ही उमेदवारांचे प्रमुख प्रतिस्पर्धी मराठी आहेत. उत्तर मुंबईत चार लाख, तर ईशान्य मुंबईत सात लाखांहून अधिक मतदार मराठी भाषिक आहेत. त्यातच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने घेतलेल्या भूमिकेमुळे मराठी मतांचे ध्रुवीकरण होईल किंवा प्रतिस्पध्र्याच्या पारडय़ात जास्त मते पडतील, या शक्यतेमुळे हे उमेदवार मराठीवर अधिक भर देताना दिसत आहेत. घाटकोपर येथील एका मेळाव्यात आमदार आणि भाजप प्रवक्ते राम कदम यांनी कोटक हे अस्सल मराठी असल्याचे विधान केले होते, हे त्याचेच उदाहरण.

उत्तर पश्चिम मुंबई मतदारसंघातील महाआघाडीचे उमेदवार संजय निरुपम यांच्या प्रचारफेरीत मराठी चित्रपट क्षेत्रातील मंडळी सहभागी होणार आहेत. या फेरीच्या समाजमाध्यमांवरील जाहिरातींमध्ये ‘कोण म्हणतो मराठी माणूस संजय निरुपमसोबत नाही? आम्ही आहोत’ हे वाक्य लक्ष वेधून घेत आहे.