दयानंद लिपारे

कोल्हापुरात राजकीय संदेशांची जोरदार चर्चा

निवडणूक म्हटली की एखादे वाक्य, शब्द त्या आखडडय़ाचा अर्क बनून जाते. कोल्हापुरात अशाच एका घोषवाक्याभोवती अवघी निवडणूक पिंगा घालीत आहे. काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी महाआघाडीच्या प्रचारापासून फारकत घेऊ न प्रचाराचा ‘धणुष्यबाण’ स्पष्ट करण्यासाठी ‘आमचं ठरलंय’ असे घोषवाक्य बनवले असून खांद्यावर कोणते ‘शिवधनुष्य’ पेलले आहे याचा संदेश देणे सुरु ठेवले आहे. पाटील यांचा वारू शरद पवार हे रोखतील अशी अटकळ बांधली जात होती, पण पाटील बधण्याचे नाव घ्यायला तयार नसल्याने पवार यांनीच जाहीर सभांतून ‘मीबी ध्यान्यात ठेवलंय’ असा इशारावजा संदेश दिला आहे. या दोन वाक्यांची सध्या कोल्हापुरात सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.

निवडणुकीत दोन भूमिका घेतल्या जातात. एक निवडून आणायची आणि दुसरी कोणाला पाडायचे याची. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात आमदार सतेज पाटील यांनी दुसऱ्या भूमिकेला महत्त्व दिले आहे. पाटील यांचे शिवसेनेचे उमेदवार संजय मंडलिक यांच्याविषयीचे प्रेम कोणत्याच टप्प्यावर लपून राहिले नाही. राजकीय घडामोडीत मंडलिक यांना पुन्हा शिवसेनेच्या धनुष्यबाणावर लढावे लागले. आपला मित्र महायुतीत गेल्याने शत्रू महाआघाडीत राहिल्याने पाटील यांनी मंडलिकांवरचे आपले हे प्रेम उघडपणे व्यक्त करण्यास सुरुवात केली.

कोल्हापूरमधील प्रत्येक विधानसभा मतदारसंघात प्रभाव असलेले पाटील यांनी या निवडणुकीसाठी ‘समाज माध्यमा’तून संदेश द्यायला सुरुवात केली आहे. दोन दिवसापूर्वी पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त शहरातील फलकांवर आणि जाहिरातीमध्ये भगव्या रंगात ‘आमचं ठरलंय’ हे घोषवाक्य बरेच काही सांगून जात होते. हे कमी की काय म्हणून शुभेच्छा देण्यासाठी आलेले मंडलिक आणि पाटील यांना कार्यकर्त्यांनी एकाचवेळी खांद्यावर उचलून मिरवले. या वेळी ‘आमचं ठरलंय’ते काय याचा संदेश कार्यकर्त्यांपर्यंत बरोबर पोहोचला आहे.  सतेज पाटील यांचा वारू ज्येष्ठ नेते शरद पवार हे रोखतील अशी अटकळ बांधली जात होती, पण त्यांच्या राजकीय मखलाशीनंतरही पाटील इरादा बदलण्यास तयार नाहीत. त्यामुळे त्यावर पवार यांनी प्रतिकाराच्या भाषेत भाष्य केले. जाहीर सभांतून पवार यांनी ‘मी बी ध्यान्यात ठेवलंय’ अशी मल्लिनाथी करीत पुढच्या टप्प्यावर हा संघर्ष रंगणार याचा इशारेवजा संदेश दिला आहे. दुसरीकडे सतेज पाटील समर्थकांनी पवार यांना प्रत्युत्तर दिले आहे. ‘आम्ही तुमचा आदर करतो पण तुम्ही हे लक्षात ठेवावे’ असे म्हणून महाडिक यांच्या चुकांची यादी उद्धृत केली आहे.

पवार यांच्या पाठोपाठ जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष प्रकाश आवाडे यांनी दोन्ही शब्दांचा संदर्भ देत ‘नाराज असलेल्यांचे ठरलंय’,  तुम्हीही ‘ध्यान्यात ठेवलंय’ परंतु, कोल्हापूरच्या जनतेने राजू शेट्टी व धनंजय महाडिक यांना खासदार ‘करायचं ठरवलंय’ असे विधान करीत याबाबतचा R म पुढे सुरु ठेवला. प्रचारात कोण कोठे आहे याचा पक्षीय अहवाल वरिष्ठांकडे पोहोचला आहे, अशी पुस्तीही त्यांनी जोडली.