पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी अभिनेता सनी देओल यांचा उल्लेख फिल्मी फौजी करत टोला लगावला आहे. ‘सनी देओल फिल्मी फौजी आहे, मात्र मी खरा फौजी आहे’, असं वक्तव्य अमरिंदर सिंग यांनी केलं आहे. सनी देओल यांनी नुकताच भाजपा पक्षात प्रवेश केला असून लोकसभा निवडणुकासाठी गुरुदासपूर येथून त्यांना उमेदवारी देण्यात आली आहे. आम्ही अत्यंत सहजपणे सनी देओल यांचा पराभव करु असा विश्वास अमरिंदर सिंग यांनी व्यक्त केला आहे.

‘भाजपाने गुरुदासपूर येथून उमेदवारी दिलेले सनी देओल फिल्मी फौजी आहेत. पण मी खरा फौजी आहे. आम्ही त्यांचा पराभव करु. गुरुदासपूरमधून काँग्रेसचे उमेदवार असणाऱ्या सुनील जाखर यांना किंवा काँग्रेसला त्यांच्यापासून कोणताही धोका नाही’, असं अमरिंदर सिंग यांनी म्हटलं आहे.

23 एप्रिल रोजी सनी देओल यांनी भाजपात प्रवेश केला आणि त्याच दिवशी त्यांनी गुरुदासपूरमधून उमेदवारी जाहीर कऱण्यात आली. यावेळी बोलताना सनी देओल यांनी सांगितलं होतं की, ‘ज्याप्रकारे माझे वडील अटलजी यांच्याशी चांगलं नात होतं. त्याप्रकारे मी आज मोदींना साथ देण्यासाठी आलो आहे. भाजपा कुटुंब असून त्यासाठी जे शक्य आहे ते सर्व करणार. मी जे काही करणार आहे ते बोलणार नाही, माझ्या कामातून दाखवून देईन’.

गुरुदासपूर येथे अभिनेते विनोद खन्ना भाजपचे खासदार होते. पंजाबमध्ये १३ जागा आहेत. त्यापैकी ३ जागा म्हणजेच अमृतसर, गुरुदासपूर आणि होशियारपूर भाजप लढवणार आहेत. सनी देओल यांचे वडील धर्मेंद हे भाजपाचे बिकानेरचे माजी खासदार आहेत, तर त्यांच्या पत्नी हेमा मालिनी मथुराच्या भाजपा खासदार आहेत.