लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. अभिनेते सनी देओल यांनी भाजपात प्रवेश केला आहे. पंजाबच्या गुरुदासपूर मतदारसंघातून ते निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल आणि संरक्षण मंत्री निर्मला सीतारमन यांच्या उपस्थितीत सनी देओल यांनी मंगळवारी भाजपात प्रवेश केला.

पक्षप्रवेशावेळी सनी देओल म्हणाले, ‘ज्याप्रकारे माझे वडील अटल बिहारी वाजपेयी यांच्याशी जोडले गेले होते. त्याचप्रकारे आता मी मोदीजींशी जोडलो गेलो आहे. देशातील तरुणांना मोदींच्या नेतृत्वाची गरज आहे. मला जे काही शक्य असेल ती सर्व कामं मी करेन. मी फार बोलणार नाही पण काम करून दाखवेन.’ दरम्यान, गुरुदासपूर इथे अभिनेते विनोद खन्ना भाजपचे खासदार होते. पंजाबमध्ये १३ जागा आहेत. त्यापैकी ३ जागा म्हणजेच अमृतसर, गुरुदासपूर आणि होशियारपूर भाजप लढवणार आहेत.

सनी देओलचे वडील धर्मेंद हे भाजपाचे बिकानेरचे माजी खासदार आहेत, तर त्यांच्या पत्नी हेमा मालिनी मथुराच्या भाजपा खासदार आहेत.