News Flash

मोदींविरोधी तक्रारींवर निर्णय घ्या!

काँग्रेसने दाखल केलेल्या ११ तक्रारींपैकी दोन तक्रारींवर आपण निर्णय दिला आहे,

निवडणूक आयोगाला सर्वोच्च न्यायालयाचा आदेश; सोमवापर्यंत मुदत

नवी दिल्ली : आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन केल्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्याविरोधात काँग्रेसने दाखल केलेल्या तक्रारींवर सोमवार ६ मेपर्यंत निर्णय घ्या, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी निवडणूक आयोगाला दिला. काँग्रेसने या दोन्ही नेत्यांविरोधात ११ तक्रारी दाखल केल्या असून आयोग संथगतीने त्यावर विचार करीत आहे, असा आरोप आहे.

विशेष म्हणजे अमित शहा यांच्याविरोधातील तक्रारींची आता तड लागणार असली तरी त्यांच्या गांधीनगर मतदारसंघातील निवडणूक २३ एप्रिललाच संपली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाराणसी मतदारसंघात अखेरच्या टप्प्यात म्हणजे १९ मे रोजी मतदान आहे.

काँग्रेसने दाखल केलेल्या ११ तक्रारींपैकी दोन तक्रारींवर आपण निर्णय दिला आहे, असा पवित्रा आयोगाने न्यायालयात घेतला. आयोग सत्तारूढ पक्षाच्या या दोन बडय़ा नेत्यांविरोधातील तक्रारींवर कूर्मगतीने निर्णय घेत असल्याचा आरोप काँग्रेस खासदार सुश्मिता देव यांनी याचिकेद्वारे केला आहे. त्यांच्या वतीने ज्येष्ठ विधिज्ञ अभिषेक मनु सिंघवी यांनी युक्तिवाद केला.

सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने सांगितले की, आम्ही या प्रकरणाची सोमवार ६ मे रोजी सुनावणी करणार असून, तोपर्यंत याचिकाकर्त्यांच्या उर्वरित निवेदनांवर निवडणूक आयोगाने निर्णय घ्यावा.

प्रथमच मतदान करणाऱ्या मतदारांनी त्यांची मते बालाकोट हवाई हल्ल्यातील शूरवीर आणि पुलवामा हल्ल्यात मारले गेलेले सैनिक यांना समर्पित करावे, असे आवाहन मोदी यांनी गेल्या महिन्यात लातूर येथील सभेत केले होते. तर काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी अल्पसंख्याक समुदायाचे प्राबल्य असलेला मतदारसंघ निवडल्याबद्दल १ एप्रिलला वर्धा येथील भाषणात त्यांनी राहुल यांच्यावर टीका केली होती. जवानांचा उल्लेख वा जवानांच्या शौर्याचा वापर प्रचारात टाळावा, अशी सूचना निवडणूक आयोगानेच केली होती. त्या सूचनेचे उल्लंघन झाल्याची काँग्रेसची तक्रार होती. तसेच देशाच्या पंतप्रधानांनी एखादा मतदारसंघ अल्पसंख्याक असल्याने कुणी निवडल्याचे सांगून, देशाचा पंतप्रधान म्हणून जाती, धर्माच्या आधारावर भेदभाव करणार नाही, या शपथेचा भंग केल्याबद्दलही काँग्रेसने टीका केली होती. मात्र या दोन्ही बाबतीत आयोगाने मोदी यांनी आचारसंहिता भंग केला नसल्याचा निवाडा केला आहे.

गेल्या चार आठवडय़ात भाजप नेते आचारसंहितेचा भंग करणारी विधाने बिनदिक्कत  करीत आहेत. त्याबाबत निवडणूक आयोगाकडे काँग्रेसने तब्बल ४० तक्रारी दाखल केल्या आहेत. तरीही आयोगाने त्यावर कोणतीही कारवाई सुरू केलेली नाही. आयोगाचे हे वर्तन निष्क्रियतेचेच लक्षण नव्हे, तर भेदभावपूर्णही असल्याचे देव यांनी याचिकेत म्हटले आहे. १० मार्चला निवडणूक अधिसूचना लागू झाल्यापासून मोदी आणि शहा यांनी द्वेषाने भरलेली अनेक भाषणे केली आहेत. त्यांच्या चित्रफिती समाजमाध्यमांवरही आहेत. असे असताना आयोग गप्प असल्याबद्दल आक्षेप घेण्यात आला आहे. आयोगाचे वर्तन हे घटनेच्या १४व्या आणि २१व्या कलमाचा सरळसरळ भंग आहे, असाही आरोप याचिकेत आहे.

निवडणूक आयोगासारखी स्वतंत्र यंत्रणा असताना तक्रारींची तड लागावी यासाठी सर्वोच्च न्यायालयात जावे लागण्याची वेळ आल्याबद्दलही खंत व्यक्त करण्यात आली आहे.

मोदी यांना तिसऱ्यांदा दिलासा

नवी दिल्ली : राजस्थानातील बाडमेर येथील प्रचार सभेत बोलताना, भारताकडील अणुबॉम्ब काही दिवाळीसाठी राखून ठेवलेला नाही, असे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले होते. त्यावरून त्यांच्या विरोधात दाखल झालेली तक्रार निवडणूक आयोगाने नाकारली असून हे वक्तव्य आचारसंहितेचा भंग करणारे नसल्याचे म्हटले आहे. आयोगाकडून मोदी यांना तिसऱ्यांदा असा दिलासा मिळत आहे. याआधी लातूर आणि वर्धा येथील सभेतील वक्तव्यांवरून त्यांच्याविरोधात आचारसंहिता भंगाची तक्रार नोंदवण्यात आली होती. त्या दोन्ही प्रकरणी आयोगाने त्यांना निर्दोष ठरविले.

योगी आदित्यनाथ अडचणीत

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना निवडणूक आयोगाने गुरुवारी कारणे दाखवा नोटीस बजावली. उत्तर प्रदेशातील संभल येथील १९ एप्रिल रोजीच्या प्रचारसभेत आदित्यनाथ यांनी ‘बाबर की औलाद’ अशी टिप्पणी केली होती. त्यावर नोटीस बजावत आयोगाने त्यांना उत्तर देण्यासाठी २४ तासांची मुदत दिली.

राहुल निर्दोष

नवी दिल्ली : आदर्श आचारसंहिता उल्लंघनाच्या तक्रारीत निवडणूक आयोगाने काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना निर्दोष घोषित केले. २३ एप्रिल रोजी मध्य प्रदेशातील एका सभेत त्यांनी अमित शहा यांचा उल्लेख करताना त्यांच्यावर खुनाचा आरोप होता, असे म्हटले होते. मात्र त्यांच्या भाषणाची चित्रफीत पाहिल्यानंतर त्यांनी आचारसंहितेचा भंग केला नसल्याचे आयोगाने स्पष्ट केले.

राज यांना नोटीस

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्रात घेतलेल्या जाहीर सभांवरून निवडणूक आयोगाने त्यांना नोटीस पाठवली असून सभांच्या खर्चाचा तपशील मागितला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 3, 2019 3:00 am

Web Title: supreme court order election commission to take decision on modi complaints
Next Stories
1 काँग्रेस-भाजप छुपा समझोता असल्याचा मायावतींचा आरोप
2 मोदी यांच्याबद्दलच्या व्हिडीओमुळे वाद ; स्मृती इराणी यांची प्रियंका गांधी यांच्यावर टीका
3 मोदी हेच पंतप्रधान व्हावेत,असे इम्रान यांना का वाटते?
Just Now!
X